माता सुरक्षित तर घर सुरक्षित आरोग्य शिबीर अभियान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्ह्यातील 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी नवरात्र उत्सावापासून 26 सप्टेंबर ते 26 ऑक्टोंबर या कालावधीत माता सुरक्षित तर घर सुरक्षित आरोग्य शिबीर अभियान राबविण्यात येणार आहे.  18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देणे व सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करुन देणे हा या आरोग्य शिबीर अभियानाचा उद्देश आहे.

उपक्रम : प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर दररोज माता व महिलांच्या तपासणीची शिबिरे घेण्यात येणार आहेत. वैद्यकीय अधिकारी हे स्वत: मातांची तपासणी करणार आहे. आजारी महिलांना उपचार आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर संदर्भीत करण्यात येणार आहे.

उपकेंद्र/आरोग्य वर्धिनी केंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत मातांची तपासणी, समुपदेशन  हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी यांनी 18 वर्षावरील महिलांची तपासणी करणार आहेत त्यासाठी अंगणवाडी केंद्रात किंवा ग्रामपंचायतीत तपासणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

ग्रामीण रुग्णालये व त्यावरील रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी आणि उपलब्धतेनुसार स्त्री रोग तज्ञामार्फत दररोज तपासणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरासाठी सेवाभावी स्त्री रोग तज्ञ यांची मदत घेण्यात येणार आहे. शिबीरामध्ये जोखमीच्या माता तसेच इतर स्त्रीरोग आजाराच्या माता/महिला (18 वर्षावरील) संदर्भीत होतील याचे नियोजन करण्यात येणार आहे. या कालावधीत भरारी पथकांमार्फत सर्व गावांना भेटी देऊन 18 वर्षावरील महिला व माता यांची तपासणी करुन शिबीरांमध्ये औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक रुग्णालयात उपलब्ध समुपदेशकामार्फत   रुग्णालयात येणारा रुग्ण व त्याचे नातेवाईक यांचे सामुहिक समुपदेशन करण्यात येणार आहे.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित आरोग्य शिबीर अभियान कालावधीत नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. महिलांची/दाम्पंत्याची यादी आशा व अंगणवाडी यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यांची तपासणी करुन समुपदेशानाचे विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.  तसेच किमान 3 दिवस विशेष सोनोग्राफी शिबिरे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त गरोदर मातांची तपासणी करण्यात येणार आहे. दोन अपत्यावरील मातांना कुटुंब कल्याण शस्त्रक्रियाबाबत माहिती दिली जाणार आहे.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित आरोग्य शिबीर अभियान कालावधीत 18 वर्षावरील महिलांची आरोग्य तपासणी, तज्ञांमार्फत तपासणी, औषधोपचार व समुपदेशन केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील 400 उपकेंद्रे, 84 प्राथमिक आरोग्य केंद्र, 18 उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय या ठिकाणी आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सेवा दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यातील 18 वर्षावरील महिला, माता, गरोदर स्त्रिया यांच्या सर्वांगीण तपासणीसाठी   माता सुरक्षित तर घर सुरक्षित विशेष आरोग्य शिबीर    26  ऑक्टोंबर  2022 पर्यंत  राबविण्यात येणार आहे. 18 वर्षावरील सर्व महिला, माता, गरोदर स्त्रिया लाभ यांनी या शिबीराचा लाभ घेऊन आपले आरोग्य चांगले ठेवावे.


Back to top button
Don`t copy text!