श्रीरामच्या मागील थकीत देण्यांपैकी ५ कोटीहुन अधिक रक्कम कामगारांच्या बँक खात्यावर जमा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०४ नोव्हेंबर २०२१ | फलटण | श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्कशाळेतील सुमारे १७६ कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युईटी व कामगार अनामत अशी ५ कोटीहुन अधिक रक्कम मागील थकीत रक्कमेपैकी असून त्याबाबत आपण कामगारांना दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्तता केली आहे, कोणाच्या उपोषण किंवा आंदोलनामुळे नव्हे तर कामगारांचे जुने संबंध जपण्याचा आपला प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्कशाळेतील कामगारांची ग्रॅच्युईटी व कामगार अनामत त्यांच्या बँक खात्यावर जमा झाल्यानंतर कामगारांनी एकत्र येवून श्रीमंत रामराजे यांची त्यांच्या येथील लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी भेट घेतली त्यावेळी श्रीमंत रामराजे बोलत होते, कामगारांना दीपावली सणाच्या शुभेच्छा देत सतत संपर्क ठेवून अडीअडचणी मांडण्याचे आवाहन त्यांनी केले.
श्रीराम सहकारी साखर कारखाना आर्थिक गर्तेत रुतल्याने बंद पडल्यानंतर त्याच्या आर्थिक परिस्थितीची माहिती घेवून या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींनी श्रीराम अवसायानात काढण्याचा सल्ला दिला होता मात्र ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांचे हित लक्षात घेऊन आपण तज्ञ व्यक्तींचे सल्ले न मानता कारखाना सुरु ठेवला, १५ वर्षे झगडल्यानंतर आज चांगले दिवस आल्यामुळेच कामगार व ऊस उत्पादक समाधानी असल्याचे निदर्शनास आणून देत श्रीमंत मालोजीराजे राजेसाहेब व त्यांच्या तत्कालीन सहकाऱ्यांनी श्रीरामची उभारणी करताना पाहिलेले स्वप्न चेअरमन म्हणून माजी आमदार स्व. श्रीमंत शिवाजीराजे यांनी आपल्या २५ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत पूर्ण केले, मात्र नंतरच्या २५ वर्षात श्रीरामला दृष्ट लागली ती दुरुस्त करण्यात आम्ही पुन्हा २५ वर्षे प्रयत्नशील आहोत म्हणून श्रीराम पूर्वपदावर पोहोचल्याचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

माजी चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व विद्यमान चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर दीपावलीच्या मुहूर्तावर गेली २/३ वर्षे सतत उपोषण करीत असणाऱ्या निवृत्त कामगारांना त्यांची असणारी सर्व देणी देण्याचा आम्ही शब्द दिला होता. त्या शब्दाप्रमाणे सन २०१७ ते मार्च २०२१ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कामगारांची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याचे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले.

श्रीराम कारखान्याची सत्ता आमच्याकडे पुन्हा आली, त्यावेळी कारखान्यातील कामगार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबीत होते. त्यामधील बरेच प्रश्न आम्ही निकाली काढले असून श्रीराम सहकारी साखर कारखान्यामध्ये कोणी राजकारण न करता आपल्यामुळेच हे देणे दिले असे मानण्याचे कारण नाही ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण उपोषणाला बसला आहात ते या कारखान्याला ऊस देखील घालत नाहीत, हे त्यांनी लक्षात ठेवणे गरजेचे असून आता या निवृत्त कामगारांनी आपली दिवाळी गोड करावी अशा शुभेच्छा श्रीमंत रामराजे यांनी दिल्या. त्यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन भोसले व संचालक उपस्थित होते.
सन २०१७ ते मार्च २०२१ दरम्यान श्रीराम कारखाना व अर्कशाळेतून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे १७६ जुन्या कामगारांना ४ कोटी ६८ लाख ८० हजार २०१ रुपये ग्रॅच्युईटी आणि ५१ लाख ७६ हजार ४१८ रुपये ९३ पैसे अशी एकूण ५ कोटी २० लाख ५६ हजार ६१९ रुपये ९३ पैसे त्यांच्या बँक खात्यात वर्ग केल्याचे श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी निदर्शनास आणून दिले.


Back to top button
Don`t copy text!