८९ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक नोंदणी; मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । महसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्यात 15 ऑगस्ट 2021 पासून ई-पीक पाहणी या व्यापक प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत 89 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली असून मराठवाड्यात सर्वाधिक नोंदणी झाली आहे.

आजअखेर ई- पीक पाहणी प्रकल्पाअंतर्गत, 89 लाख 39 हजार 848 शेतकऱ्यांनी ई-पीक ॲपवर नोंदणी केली आहे, तर 64 लाख 48 हजार 368 शेतकऱ्यांची ई-पीक ॲपवरील नोंदणी पूर्ण झाली आहे.

आज अखेर औरंगाबाद विभागात 20 लाख 75 हजार 108 पैकी 17 लाख 27 हजार 916, आणि नाशिक विभागात 19 लाख 34 हजार 767 पैकी, 13 लाख 89 हजार 756 ई-पीक पाहणी नोंदणी झाली आहे. तर अमरावती विभागात 14 लाख 15 हजार 252 पैकी, 11 लाख 97 हजार 275 आणि पुणे विभागात 20 लाख 33 हजार 441 पैकी, 9 लाख 94 हजार 747 नोंदणी पूर्ण झाली आहे. नागपूर विभागात 11 लाख 50 हजार 203 पैकी, 9 लाख 93 हजार 709 आणि कोकण विभागात 3 लाख 31 हजार 077 पैकी, 1 लाख 44 हजार 965 शेतकऱ्यांनी ई- पीक नोंदणी पूर्ण केली आहे.

ई-पीक पाहणी हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. जमीन महसूल कायद्यानुसार शेतजमिनीच्या उताऱ्यांवर पिकांची नोंद करण्याची पद्धत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन, शेत जमिनीची प्रतवारी, अतिवृष्टी किंवा दुष्काळ यामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज लावणे शक्य होते. या पीक नोंदणीच्या आधारे शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणे देखील सुलभ होणार आहे. ई-पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजण्यास मदत होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!