दैनिक स्थैर्य । दि.१८ जानेवारी २०२२ । मुंबई । मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यनिमित्ताने राज्यभर विविध उपक्रम आयोजित केले आहेत. यात अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे. मंत्रालयात मराठी भाषा विभागाच्या भाषा संचालनालयाद्वारे आयोजित युवा कवींच्या संमेलनाचे श्री.देसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, सहसचिव मिलींद गवादे, भाषा संचालक श्रीमती विजया डोणीकर उपस्थित होते. नवोदित कवी संमेलनात सहभागी युवा कवींनी आपल्या कविता यावेळी सादर केल्या.
नव्या जाणीवांच्या कविता सादर करणारे हे कवी राज्यातील विविध भागातून निमंत्रीत केले गेले होते. यात प्रशांत केंदळे, पवन नालट, वृषाली विनायक, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, कमलेश महाले, प्रदीप कोकरे, अक्षय शिंपी आदिंनी आपल्या कविता सादर केल्या. या कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान युवा कवी महेश दत्तात्रय लोंढे यांनी भूषविले.
निसर्गाशी नातं सांगणाऱ्या कविता, कोरोनाच्या परिस्थितीतील कविता, मातृत्व आणि नात्याच्या कविता अशा विविध विषयावरील कवितांनी रसिकांची मने जिंकून घेतली. मराठी भाषेला नवे शब्द देऊन त्यास समृद्ध करण्याची जबाबदारी युवा साहित्यिकांवर असल्याचे कवी संमेलनाचे अध्यक्ष श्री.लोंढे यांनी सांगितले.
झब्बा आणि कुर्ता ही कवींची प्रतिमा आता बदलत असून जीन्स आणि टी-शर्ट या आधुनिक पेहरावातील कवी मराठी भाषेच्या संवर्धनात मोलाचा वाटा उचलत आहेत. युवा साहित्यिकांच्या रुपाने एक आशादायी चित्र या संमेलनातून दिसले आहे, अशा शब्दात भाषा संचालक श्रीमती डोणीकर यांनी उपस्थित कवींचे आभार मानत त्यांना प्रोत्साहित केले.