स्थैर्य, फलटण, दि. ९ : देशात कोरोना विषाणू पुन्हा डोके वर काढत असतानाच कोरोनावरील लसीकरणाबाबत सरकारने मोठा निर्णय नुकताच घेतलेला आहे. देशभरातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर आता केंद्र सरकारने १ मार्चपासून देशातील सर्वसामान्य जेष्ठ नागरिकांना व विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना कोरोनावरील लसीकरण सुरू केलेले आहे. तरी फलटण मधील जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केलेले आहे.
या बाबत बोलताना मुख्याधिकारी काटकर म्हणाले कि, ६० वर्षांपुढील असलेल्या जेष्ठ नागरिकांना कोणत्याही अटी विना लसीकरण केले जाणार आहे. त्यांच्यासोबत विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करूनच लसीकरण केले जाणार आहे. तरी फलटण मधील जास्तीत जास्त नागरिकांनी कोरोनावरील लसीकरण करून घ्यावे. विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांनी https://selfregistration.covin.gov.in/ या लिंकद्वारे नोंदणी करावी व लसीकरण करून घ्यावे.
आता फलटण नगर परिषदेच्या शाळा नंबर १ म्हणजेच बाहुली शाळा येथे असणाऱ्या नगरपालिकेच्या दवाखान्यात लसीकरण सुरु आहे. जर या ठिकाणी गर्दीचे प्रमाण वाढत असेल तर त्याचा अंदाज घेऊन आगामी काळामध्ये नगरपरिषदेच्या मार्फत शहरातील अजून काही ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात येईल, असेही मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी स्पष्ट केले.