
स्थैर्य, पुणे, दि. 28 : यंदा 1 जूनला नैऋत्य मान्सून केरळमध्ये पोहचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मे रोजी दक्षिण-पूर्वेकडील आणि पूर्वेकडील मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी मान्सून लवकर केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दक्षिण-पश्चिम मान्सूनने गुरुवारी मालदीव कोमोरिन भागातील काही भाग, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान सागर आणि अंदमान व निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये प्रवेश केला. पुढील 48 तासात मालदीव-कोमोरिन क्षेत्राच्या आणखी काही भागातून मान्सून पुढे जाण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रावर चक्रीवादळचा प्रभाव आहे, पश्चिम मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा प्रभाव ट्रोफोस्फेरिक स्तरापर्यंत विस्तारित आहे. पुढच्या काही तासांमध्ये मान्सून वेगाने पुढे येणार असल्याचा अंदाज आहे.