
दैनिक स्थैर्य | दि. १ जानेवारी २०२५ | मुंबई |
राज्यातील विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणार्या योजनांमध्ये दिरंगाई होणारा विलंब टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय. संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या विशेष सहाय्य योजनांचे पैसे महाडीबीटीमधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करून कालापव्यय टाळण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी दिले आहेत. मंत्रालयातून विभागीय आयुक्त मग जिल्हाधिकारी आणि तिथून तहसील कार्यालय करत लाभार्थ्यांना या योजनांचे पैसे मिळतात. त्यामुळे यासाठी बरेच दिवस लागतात.
सामाजिक न्याय विभागाच्या १०० दिवसांच्या विभागामार्फत राबविण्यात येणार्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. शासकीय वसतिगृह इमारतींची आवश्यक दुरुस्ती करावी, वसतिगृहांत सोयी वेळेत मिळतील याची खात्री करावी. तसेच त्यांची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन करावी. जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाइन करावी. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल लवकरात लवकर सुरू करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते.