स्थैर्य, फलटण, दि. १७ : सातारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या फलटण शाखेचे अध्यक्ष मेजर डॉ. मोहन घनवट यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील शासन निर्णयानुसार ग्राहकांच्या जिल्हा स्तरावरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी सातारा यांनी सातारा जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय व शासकीय सदस्यांच्या या नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत.
त्यामध्ये ग्राहक संघटनांचे १० सदस्य, वैद्यकीय व्यवसायाचे २ प्रतिनिधी, व्यापार व उद्योग क्षेत्राचे प्रत्येकी एक याप्रमाणे २ प्रतिनिधी, पेट्रोल व गॅस विक्रेत्यांचे प्रतिनिधी, शेतकरी २ प्रतिनिधी, महापालिका/नगर पालिकांचे दोन प्रतिनिधी, शाळा व महाविद्यालय प्रत्येकी एक याप्रमाणे २ प्रतिनिधी हे २१ आणि शासकीय अधिकारी पोलीस अधिक्षक, सहाय्यक नियंत्रक वैध मापन, सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन, आरोग्याधिकारी जिल्हा परिषद सातारा, कार्यकारी अभियंता दूरसंचार विभाग, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी अशी ३२ जणांची ही जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी या परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सदस्य सचिव आहेत.
ग्राहक संघटनांच्या प्रतिनिधींमधुन ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या दादासाहेब काळे वाई, रंगराव जाधव सातारा, सौ. सुनीता राजेघाटगे सातारा, मधुकर बबन मोरे सोनाईचीवाडी, ता. पाटण यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.