“अदानी उद्योगातील २० हजार कोटी रुपयांची चौकशी करण्याची हिंमत मोदींनी दाखवावी”, काँग्रेसचे थेट आव्हान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ एप्रिल २०२३ । मुंबई । मोदी सरकारने मागील ९ वर्षात मित्रोंसाठी काम करत जनतेचा पैसा त्यांच्या खिशात घालण्याची व्यवस्था केली आहे. देशातील सर्व सरकारी उद्योग, कंत्राटे फक्त अदानींनाच बहाल केली आहेत. अदानी समुहात २० हजार कोटी रुपये शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवण्यात आले आहेत. हा पैसा कुठून आला? हाच प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे. हे २० हजार कोटी रुपये कुठून आले ? याची चौकशी करण्याची हिम्मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवावी, असे आव्हान काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

यावेळी नाना पटोले पुढे म्हणाले की, निरव मोदी, ललित मोदी, विजय माल्या या चोर, दरोडेखोरांनी जनतेचा पैसा लुटुन परदेशात पळाले. निरव मोदी व ललित मोदीला चोर म्हटल्याने राहुल गांधीना मानहानीच्या प्रकारणात सुरतच्या कोर्टाने शिक्षा दिली व त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांची खासदारकी भाजपा सरकारने रद्द केली. हे सर्व भाजपाकडून ठरवून केले आहे. मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवला, मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश केला म्हणून राहुल गांधींवर सुडबुद्धीने कारवाई केली, असा आरोप त्यांनी केला.

मोदी-अदानी भ्रष्ट युतीचा पर्दाफाश करण्यासाठी प्रदेश काँग्रेसने राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार परिषदा घेतल्या. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाणे येथे बोलत होते. विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात अहमदनगर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण परभणी, पृथ्वीराज चव्हाण पुणे, तर सांगलीत विधान परिषद गटनेते आ. सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान पालघर, आ. कुणाल पाटील नाशिक, बस्वराज पाटील धाराशिव, यवतमाळ शिवाजीराव मोघे, पिंपरी चिंचवड आ. प्रणिती शिंदे, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी चंद्रपूर येथे तर माजी मंत्री, आमदार यांनी इतर जिल्ह्यात पत्रकार परिषद घेऊन देशातील परिस्थिती विषद केली.


Back to top button
Don`t copy text!