दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑक्टोबर २०२१ | सातारा | परहर फाटा येथे कंपनीच्या लेबर कॉन्ट्रॅक्टरची कार अडवून कोयत्याचा धाक दाखवून सव्वा पाच लाख रुपये लुटणार्या टोळीला जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मोक्का लावला आहे.
राजु अशोक जाधव (रा. माणगाव हिंजवडी पुणे), प्रमोद उर्फ बारक्या पारसे (कात्रज कोंढवा पुणे), शिवा उन्नपा राठोड, पवन विकास ओव्हाळ (दोघे रा. बिबवेवाडी पुणे), रोहन सतीश भालके (कात्रज पुणे), विशाल लक्ष्मण शिरवले, दत्तात्रय किसन शिरवले (दोघे रा. शिरवली, ता. भोर, जि. पुणे) व कृष्णा आनंदा चव्हाण (रा. आसेगाव, ता. बसमत, जि. हिंगोली) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, दि.9 रोजी दुपारी 5.20 वाजण्याचे सुमारास तरडगाव, ता. फलटण येथे परहर फाटा ते मॅग्नेशिया कंपनीकडे जाणारे रोडवरुन यातील फिर्यादी क्रेएटा कार (एमएच 12 – टीके 7321) मधुन मॅग्नेशिया कंपनीकडे लॅबरचे पेमेंट करण्यासाठी जात होते. मॅग्नेशिया कंपनीच्या अलिकडे रेल्वे पुलावर अनोळखी पाच चोरट्यांनी फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवून कोयता कारचे ड्रायव्हर बाजुचे काचेवर मारुन काच फोडुन कारमधील 5 लाख 34 हजार रोख रक्कम, मोबाईल, कारची चावी असा ऐवज जबरीने चोरुन दोन मोटार सायकलवरुन पळुन गेल्याप्रकरणी लोणंद पोलीस ठाणेस गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याचा तपास करून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांनी आरोपींना अटक करून चोरलेल्या रकमेपैकी 4 लाख 26 हजार हस्तगत केले होते.
निर्मनुष्य रस्त्यावर अडवून जबरी चोरी करणार्या टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाईचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार या गून्ह्यातील आरोपी हेदेखील पुणे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
संघटितपणे, आर्थिक फायद्याकरीता पुणे व सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत शरीराविरुध्दचे व मालमत्तेचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न केले व महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण 1999 अन्वये कारवाई करीता पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर यांच्याकडे मोक्का अंतर्गत प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, कोल्हापूर मनोज लोहिया यांनी मंजुरी दिली आहे.
तपास फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे करत आहेत. मोक्का प्रस्ताव मंजुरीकरीता पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक विशाल के वायकर (लोणंद पो.स्टे), पो.ना. अमित सपकाळ, हवालदार महेश सपकाळ, राजेंद्र अडसुळ, गोविंद आंधळे, फैय्याज शेख, सिध्देश्वर वाघमोडे, अमोल अडसुळ यांनी सहभाग घेतला.
जुगारात हरल्यानंतर पैसे मिळवण्यासाठी जबरी चोरी
आरोपी विशाल शिरवले हा दहावी नंतर अभिनव एज्युकेशन सोसायटी वडवाडी ता . खंडाळा येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत असताना त्याची आरोपी कृष्णा आनंदा चव्हाण यांचेशी ओळख होवुन त्यामध्ये चांगली मैत्री झाली. त्यानंतर लॉकडाऊन काळात आरोपी विशाल शिरवले यास तीन पानी जुगाराची सवय लागल्याने त्यामध्ये ऑनलाईन जुगारामध्ये तो 50,000 रुपये हरला. त्यास पैशाची गरज भासू लागल्याने व लोकांचे उधारीचे पैसे द्यायचे असल्याने त्याने मित्र कृष्णा चव्हाण यांचेकडे पैशाची मागणी केली. कृष्णा चव्हाणने त्याचेकडे पैसे नसल्याचे सांगुन त्याचे पुण्यातील मित्र राजु जाधव, प्रमोद उर्फ बारक्या पारसे, रोहन भालके, शिवा राठोड, पवन ओव्हाळ यांचेशी ओळख करून देवुन ते गुन्हेगारी क्षेत्रातील असल्याचे सांगितले. त्यांचेकडे पैसे मागण्याचा सल्ला दिला. दरम्यान विशाल शिरवले यास त्याचा मित्र दत्ता शिरवले याने तो ज्या मॅग्नेशिया कंपनीत काम करतो, त्याचे लेबर कॉन्ट्रक्टर दर महिन्याला कंपनीत रोखीने कॅश पेमेंट करतात, त्यांचेकडे रोख रक्कम मोठया प्रमाणात असते असे सांगितले. त्यावरुन दि. 9 रोजी विशाल शिरवले, दत्ता शिरवले यांनी राजू जाधव, प्रमोद उर्फ बारक्या पारसे, रोहन भालके, शिवा राठोड, पवन ओव्हाळ यांना फोन करुन लोणंद येथे बोलवुन मॅग्नेशिया कंपनीकडे कॅश घेवुन जाणारे लेबर कॉन्ट्रक्टरची कॅश लुटण्याचा बेत ठरवला.
त्यामध्ये आरोपी राजू जाधव, प्रमोद पारशे, रोहन भालके, शिवा राठोड, पवन ओव्हाळ हे दोन मोटार सायकलवरुन कंपनीकडे जाणारे रोडवरील पुलावर जावून उभे राहिले. विशाल शिरवले व दत्ता शिरवले यांनी मोटार सायकलवरुन फिर्यादीचे कारवर पाळत ठेवून त्याची माहिती आरोपी राजू जाधव व त्याचे साथीदारांना दिली व त्यांनी मॅग्नेशिया कंपनीचे अलिकडे रेल्वे पुलावर फिर्यादीस कोयत्याचा धाक दाखवुन कोयता कारचे ड्रायव्हर बाजुचे काचेवर मारुन काच फोडुन कारमधील पाच लाख ३४ हजार रुपये रोख रक्कम मोबाईल कारची चावी असा जबरीने चोरुन दोन मोटार सायकलवरुन पळुन गेले होते.