साताऱ्यात मोबाईल चोरी करणाऱ्याला कर्नाटकमधून अटक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२२ । सातारा । साताऱ्यात किंमती मोबाईलची चोरी केल्यानंतर कर्नाटकात जावून लपलेल्या चोरट्याचा मागोवा काढत शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या शिलेदारांनी कर्नाटकात जावून मोठ्या शिताफीने चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. त्याला जेरबंद करुन साताऱ्याला आणण्यात आले असून सादिक बाबाजान मुंडारेगी (वय 19, रा. जामिया मस्जिदसमोर, होसारेत्ती, ता. जि. हवेरी, राज्य कर्नाटक) असे या मोबाईल चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून चोरीतील 97 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 18 फेब्रुवारी 22 रोजी शाहुपुरी पोलीस ठाण्यात मोबाईल हॅन्डसेट चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयामध्ये 97 हजार रुपये किंमतीचा मोबाईल हॅन्डसेट गेला होता. याबाबत तपास करताना शाहुपुरी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली  गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक मोबाईलबाबत तांत्रिक माहिती काढत होते. तपासादरम्यान सदरचा मोबाईल हॅन्डसेट हा कर्नाटक राज्यातील हावेरी या जिल्हयामध्ये असल्याची माहिती समोर आली. या माहितीवरुन शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल हसन तडवी व कॉन्स्टेबल स्वप्निल सावंत असे पथक कर्नाटक राज्यात जावून आरोपीचा शोध घेत होते. कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या भागात शोध घेत असतांना व त्याठिकाणी कर्नाटक भाषेचा अडसर येत असतांना देखील स्थानिकांचे मदतीने आरोपीचे ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त करुन आरोपी सादिक बाबाजान मुंडारेगी याला ताब्यात घेतले. त्यानंतर देखील सदरचा आरोपी हा वारंवार वेगवेगळी माहीती सांगुन दिशाभूल करत होता. मात्र, चौकशीदरम्यान पथकाने त्यास विश्‍वासात घेत त्याच्याकडून गुन्हयातील मोबाईल हॅन्डसेट करण्यात यश मिळवले. या गुन्हयाचा तपास पो . हेड. कॉ. हसन तडवी हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे, सहाय्यक पोलीस अधिक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहेडकॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, पोना अमीत माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी सहभाग घेतला होता.


Back to top button
Don`t copy text!