दैनिक स्थैर्य | दि. 11 सप्टेंबर 2023 | फलटण | सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे जातीय तणाव निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व इंटरनेट सेवा गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार बंद करण्यात आल्या आहेत; अशी माहिती मिळत आहे.
सातारचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये कलम 144 लागू केले असून कोणत्याही सामाजिक अथवा खाजगी ठिकाणी पाच माणसांहून अधिक माणसांना एकत्र जमता येणार नाही. यासोबतच कोणीही सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
आज दि. 11 सप्टेंबर पासून ते दि. 13 सप्टेंबर पर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचे आदेश मोबाईल कंपन्यांना मिळाले असून सध्या तात्पुरता स्वरूपात मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे.
फलटण शहरासह फलटण व खंडाळा तालुक्यामध्ये सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर असून कोणीही आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणार नाही; याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासोबतच जे व्हाट्सअप ग्रुप आहेत. त्या ग्रुप ॲडमिन आपल्या ग्रुपची सेटिंग बदलून ओन्ली एडमिन सेंड मेसेज अशी करावी; असे आवाहन फलटण पोलीस उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी केले आहे.