स्थैर्य, मुंबई, दि.१३: मेट्रो-3 साठीच्या कारशेडसाठी कांजूर येथील सरकारी मालकीची जागा शून्य रुपये दराने जनहितासाठी देण्याचा सरकारचा निर्णय घेण्यात आला आहे. आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे मनसेकडून स्वागत करण्यात आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहे.
‘आपल्या भूमिकांवर जे ठाम असतात, त्यासाठी न थकता, न थांबता संघर्ष करण्याची ज्यांची तयारी असते, तेच अखेर विजयी होतात! मेट्रो कारशेडसाठी ‘आरे’ जंगलाचा- तिथल्या झाडांचा बळी जाऊ नये, यासाठी सातत्याने ज्यांनी सत्ताधाऱ्यांना जाब विचारला, आंदोलनं केली, प्रसंगी तुरुंगवासही भोगला, पण पर्यावरण संवर्धनाचा आपला मुद्दा सोडला नाही, अशा सर्व पर्यावरणप्रेमींना माझा सलाम! सर्वांनी एकत्र येऊन दिलेला लढा यशस्वी होतो. ‘आरे’च्या लढ्याने हेच सिद्ध केलंय. एका अर्थाने हीच आपल्या लोकशाहीची खरी ताकद आहे. ‘आरे’बाबत योग्य निर्णय घेणारे मुख्यमंत्री आणि राज्य सरकार यांचेही आभार.’ असे म्हणत मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
कारशेडविषयी मुख्यमंत्री म्हणाले होते की, ‘मुंबईसाठी मोठा निर्णय सांगून मी लाईव्हची सुरूवात करणार आहे. आरे कारशेडला माझा सुरुवातीपासूनच विरोध होता. मी तेव्हा मुख्यमंत्री नसतानाही याविषयी भूमिका मांडली होती. त्यामुळे आरेतील जंगलासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आरे येथील 600 एकर जमीन जंगल म्हणून घोषित करण्यात आली आहे. यासोबतच या जंगलाची व्याप्ती 800 एकर झालेली आहे. यासोबतच आरेतील कारशेड दुसरीकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.