
स्थैर्य, मुंबई, दि.१९: राज्यभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात खबरदारी म्हणून लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. यावेळी संपूर्ण रेल्वेप्रवास बंद करण्यात आला होता. मुंबईची लाइफलाइन मानली जाणारी लोकल सेवाही बंद करण्यात आली होती. दरम्यान आता अनलॉक सुरू आहे. तरीही लोकल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर मनसे सर्व कायदे मोडून सविनय कायदेभंग करणार आहे.
अनलॉक सुरू झाले आहे. मुंबईतील चाकरमान्यांची कामं सुरू झाली आहेत. मात्र रेल्वे सेवा अद्याप सुरू झालेली नाही. यामुळे चाकरमान्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अनेकांनी रेल्वे सुरू करण्याची मागणी केली. तरीही सरकारने लोकल सेवा सुरू केलेली नाही. यामुळे येत्या 21 सप्टेंबरला जनतेच्या हितासाठी मनसेचा रेल्वे प्रवास असे आंदोलन मनसेतर्फे केले जाणार आहे. मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी याविषयी माहिती दिली आहे.
संदिप देशपांडे म्हणाले की, ‘लॉकडाऊनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु करण्यात आलेली आहे. या काळात बसमध्ये प्रचंड गर्दी होऊन प्रवाशांचे हाल होत आहे. प्रवाशांना आठ आठ तास हे घरी जाण्यासाठी लागत आहे. लोकांचे प्रचंड होणारे हाल बघवत नाही. सरकारला रेल्वे सुरू करण्याबाबत वारंवार विनंती करुन सरकार रेल्वे सुरू करत नाही. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणाहून येणाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे’ असं संदिप देशपांडेंनी स्पष्ट केलं आहे.