अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे अतोनात नुकसान; आमदार सचिन पाटीलांची नुकसानीची पाहणी, तातडीने पंचनामे करण्याचे आदेश


फलटण तालुक्यातील आरडगाव, कापडगाव, चांभारवाडी व हिंगणगाव परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची आमदार सचिन पाटील यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केली व प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले.

स्थैर्य, फलटण, दि. ५ एप्रिल : फलटण तालुक्यात सध्या अवकाळी पावसाने व गारपिटीने कहर केला असून, शुक्रवारी, दि. ३ एप्रिल दुपारच्या सुमारास तालुक्यातील आरडगाव, कापडगाव, चांभारवाडी आणि हिंगणगाव परिसरात प्रचंड प्रमाणात गारपीट झाली. या अस्मानी संकटामुळे ऊस, मका, कांदा, गहू यांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच, जनावरांचे गोठे आणि घरांचीही मोठी पडझड झाली आहे.

या भीषण नुकसानीची माहिती मिळताच फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील आणि युवा नेते अमरसिंह नाईक निंबाळकर यांनी तातडीने नुकसानग्रस्त गावांचा दौरा केला.

थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना दिला धीर:

आमदार सचिन पाटील आणि युवा नेते अभिजित (भैय्यासाहेब) नाईक निंबाळकर यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उद्ध्वस्त झालेल्या पिकांची आणि पडझड झालेल्या गोठ्यांची पाहणी केली. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने हवालदिल झालेल्या आणि अश्रू ढाळणाऱ्या शेतकऱ्यांशी त्यांनी आस्थेने संवाद साधला व या संकटकाळात आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असा धीर दिला.

‘तातडीने पंचनामे करून अहवाल पाठवा’ – आमदार पाटील यांचे आदेश:

या पाहणी दौऱ्यावेळी महसूल व कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आमदार सचिन पाटील यांनी अधिकाऱ्यांना जागेवरच कडक सूचना दिल्या. “महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाईच्या पुढील कार्यवाहीसाठी ते अहवाल विनाविलंब शासन दरबारी पाठवावेत,” असे आदेश त्यांनी दिले.

तसेच, “अवकाळीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे झालेले हे अतोनात नुकसान मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून शासन दरबारी ताकदीने मांडेन आणि नुकसानग्रस्त बळीराजाला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन,” अशी ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी यावेळी दिली.

या पाहणी दौऱ्यावेळी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, मंडल अधिकारी खाडे आणि धेंडे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. तसेच, जेष्ठ नेते विलासराव नलवडे, सुरेश तात्या भोईटे, रमेश भोईटे यांच्यासह नुकसानग्रस्त ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!