स्थैर्य, पांचगणी, दि. 17 : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने महाबळेश्वर तालुक्यातील ज्या-ज्या गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे, अशा गावांना आ. मकरंद पाटील यांनी भेटी देवून पाहणी केली. तेथील ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी प्रशासकीय अधिकार्यांना सूचना केल्या.
यावेळी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील, गटविकास अधिकारी नारायण घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी अजित कदम उपस्थित होते.
महाबळेश्वर तालुक्यात मुंबईवरून आलेल्या लोकांमुळे तालुक्यातील कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी व पालिका मुख्याधिकारी या प्रशासनातील अधिकार्यांनी वेळीच घेतलेेल्या योग्य त्या खबरदारीमुळे कोरोनाची साखळी वेगाने पुढे सरकली नाही. उलट ती जागोजागी खंडित होताना दिसत आहे. तरीही तालुक्यात मात्र चांगलीच खळबळ माजली होती. याच पार्श्वभूमीवर आ. मकरंद पाटील यांनी कोरोना रुग्ण आढळून आलेल्या काही गावांना भेटी दिल्या. प्रारंभी पाचगणी येथील सिद्धार्थ नगरला भेट दिली. त्यानंतर बेल एअर रुग्णालयाची पाहणी केली. तेथून जवळच असलेल्या गोळेवाडी गावासही आ. पाटील यांनी भेट दिली. निसर्ग वादळाने महाबळेश्वर येथील प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची पाहणी आ. पाटील यांनी केली. त्यानंतर कासरूड, देवळी, कोट्रोशी, पारूट, हरचंदी, गोरोशी या गावांना भेट दिली. या गावात मुंबईकरांना क्वारंन्टाईन करण्यात आले होते. त्यांची भेट घेतली. क्वारंन्टाईन कक्षात असलेल्या सोई-सुविधांचा आढावा त्यांनी घेतला.
पंचायत समितीच्यावतीने देवळी या गावातील गरजू व गरीब लोकांना अन्नधान्याचे कीटचे वाटप आ. मकरंद पाटील व तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीच्या सभापती अंजना कदम, उपसभापती संजयबाबा गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.