आमदार श्रीमंत रामराजेंच्या यशस्वी शिष्टाईने साखरवाडी कारखान्याचा पीएफ प्रश्न मार्गी

सेवानिवृत्त कामगारांच्या खात्यावर ७३ टक्के रक्कम लवकरच जमा होणार; कामगारांमधून आनंदाचे वातावरण


स्थैर्य, साखरवाडी, दि. १९ ऑगस्ट : साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यातील कामगारांचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. विधान परिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या यशस्वी शिष्टाईमुळे हा तोडगा निघाला असून, सर्वोच्च न्यायालय आणि पीएफ कमिशनर यांच्या निर्देशानुसार उर्वरित ७३ टक्के रक्कम सेवानिवृत्त कामगारांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे.

२०१७-१८ मध्ये आर्थिक अडचणींमुळे न्यू फलटण शुगर वर्क्स कारखाना बंद पडल्यानंतर, २०१९ मध्ये श्री दत्त इंडिया कंपनीने तो विकत घेतला होता. तेव्हापासून कामगारांचा भविष्य निर्वाह निधीचा प्रश्न न्यायप्रविष्ट होता. मागील वर्षी २७ टक्के रक्कम कामगारांना मिळाली होती, मात्र उर्वरित ७३ टक्के रक्कम प्रलंबित होती.

या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयात फलटण तालुका साखर कामगार युनियन, सेवानिवृत्त कामगार आणि श्री दत्त इंडिया व्यवस्थापन यांच्यासोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार थकबाकीची रक्कम थेट कामगारांच्या खात्यात जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला संचालक जितेंद्र धारू, चेतन धारू, प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप, चीफ अकाउंटंट अमोल शिंदे, साखर कामगार युनियनचे सेक्रेटरी राजेंद्र भोसले, राजेंद्र गायकवाड, पोपट भोसले, पै. संतोष भोसले, संजय जाधव, ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र भोसले, उद्योजक संजय भोसले, तसेच सेवानिवृत्त कामगार दयानंद गायकवाड, गोरख भोसले, मारुती माडकर, प्रकाश चव्हाण, सीताराम गायकवाड, कुंडलीक भोसले आणि राजे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर होताच उपस्थित सेवानिवृत्त कामगारांनी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना पुष्पहार घालून आणि पेढे वाटून आपला आनंद व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!