साताऱ्याच्या मेडिकल कॉलेजला एक रुपयाही मिळाला नाही – आमदार महेश शिंदे यांची साताऱ्यामध्ये टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्याचे विकासाचे प्रश्न प्रचंड प्रलंबित आहेत. महा विकास आघाडी शासनाच्या काळात खोटी भुमीपुजन आणि आश्वासने देऊन लोकांना भुलविण्यात आले सातारच्या मेडिकल कॉलेज ला एक रुपया सुद्धा मिळालेला नाही असा खळबळजनक आरोप कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुख्य मंत्री एकनाथ शिंदे प्रणित शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणीच्या नेमणूक प्रमाणपत्र समारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमातनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा संपर्क संपर्क प्रमुख शरद कणसे, एकनाथ ओंबळे, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव, शहर प्रमुख नीलेश मोरे, जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव, आदी यावेळी उपस्थित होते.

महेश शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 25 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांमध्ये सातारा जिल्ह्याला भरघोस निधी दिला आहे. एकट्या कोरेगाव तालुक्यात रस्ते कामांसाठी तब्बल 50 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडी शासनाने सातारा जिल्ह्यासाठी काही केले नाही. त्यांचा खोटा कळवळा आणि त्यांची खोटी भूमिपूजन यातच बराचसा वेळ गेला. सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी त्यांनी एकही रुपया दिलेला नाही. यापुढे पायाभूत सुविधांत करिता मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी स्पष्टपणे पत्रकार परिषदेत दिली.

50 खोके एकदम ओके या वादग्रस्त घोषणा विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी दिल्या . या विषयी बोलताना शिंदे म्हणाले, गेल्या अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारला फक्त खोक्याची भाषा कळत होती. त्यांचे कॉन्ट्रॅक्टर बडे भांडवलदार यांच्याशी संबंध होते. त्यामुळे ज्याला जसं दिसतं तसेच सूचते, तशा घोषणा दिल्या जातात. मी विधानसभेच्या बाहेर पडताना मला बघूनच या घोषणा दिल्या गेल्या. पण मला 50 कोटी रुपये विकास कामांसाठी मिळाले. यातच मी समाधान मानतो.

रयत शिक्षण संस्थेच्या संदर्भात बोलताना महेश शिंदे म्हणाले, ही संस्था पवार लिमिटेड कंपनी झाली आहे . संस्थेच्या घटनेप्रमाणे या संस्थेचे अध्यक्ष मुख्यमंत्री हवे आहेत. शरद पवार हे यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचे खरे पाईक असून ते आमच्या मागणीचा विचार करून कधी तरी राजीनामा देतील आणि मुख्यमंत्री कधीतरी या संस्थेचे अध्यक्ष होतील. मात्र तत्पूर्वी या संस्थेमध्ये बरेचसे चालणारे गैरप्रकार आमच्याकडे पुराव्यानिशी आले आहेत. पवारांनी गुंड, मवाली संस्थेच्या कार्यकारणी घुसवण्याचे पाप केले आहे. त्यामुळे त्यांचा हिशोब लवकरच चुकता केला जाईल. जरंडेश्वर कारखाना 100 दिवसात ताब्यात घेऊ या संदर्भात केलेल्या घोषणे बद्दल शिंदे यांना छेडले असता ते म्हणाले, जरंडेश्वर कारखाना प्रकरण ईडीच्या माध्यमातून न्यायप्रविष्ट आहे. मात्र, शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू व्हावा आणि तो शेतकऱ्यांचा राहावा याकरिता आमचे कायदेशीर दाद मागण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. शेतकऱ्याच्या हातातून कारखान्यात जाऊ देणार नाही अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली .

राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांची चौकशी होणार याविषयी सुद्धा बोलताना शिंदे म्हणाले मी अत्यंत साधा आमदार आहे. हे विषय वरिष्ठ स्तरावरचे आहेत. त्यामुळे या विषयावर अधिक भाष्य करणार नाही. आमदार शशिकांत शिंदे यांनी मला भाजपने 100 कोटीची ऑफर दिली होती असा आरोप केला होता. या आरोपाची खिल्ली उडवत बोलताना महेश शिंदे म्हणाले शिंदे साहेब शंभर कोटी जाऊ दे, शंभर रुपये दिले तरी तुम्ही तत्काळ भाजपमध्ये. या नाहीतर तर काही खरे नाही. जर भाजपमध्ये आलात तर तुमचे मनापासून स्वागत आहे. पुढे त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे करायचे हे वेळ आल्यानंतर बघू. सध्या तरी ते राष्ट्रीय स्तरावरचे नेते आहेत. त्यांच्याविषयी मी जास्त बोलू नये. कारण मी एक सामान्य आमदार आहे.


Back to top button
Don`t copy text!