स्थैर्य, जामखेड, दि. 07 : कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून शेतीबाबत नवनवीन उपक्रम सुरू आहेत. आता त्यांचे वडील तथा बारामती अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार हे देखील आपल्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून मतदारसंघातील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना कृषीबाबत मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी आतापर्यंत तालुक्यात चार दिवसांत 87 गावांत 24 ठिकाणी जाऊन शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्रे घेतली.
बारामती अग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व जामखेड तालुका कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मार्गदर्शन व चर्चासत्रे घेण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना कृषीबाबत देण्यात येणाऱ्या धड्यांमध्ये अनेक शेतकरी हिताच्या योजना व त्याबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. आ. रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांसाठी मतदारसंघातील सर्व गावे पिंजून काढली.
शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, शेतात चांगल्या प्रतीचे दर्जेदार वाण पेरता यावे, याच माध्यमातून शेतकरी सक्षम बनेल, हा दृष्टिकोन समोर ठेवून खरीप पेरणीपूर्व नियोजानांतर्गत अभियान राबविण्यात येत आहे. राजेंद्र पवार यांनी जलसंधारण, पीकविमा, दर्जेदार वाण आदींसह कोरडवाहू भागात जलदगतीने येणाऱ्या तूर, बाजरी, कांदा, उडीद आदी पिकांच्या वाणांविषयी देखील शेतकऱ्यांना सखोल माहिती दिली. हे वाण पुढील वर्षी आपण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊ, असेही ते म्हणाले.
ट्रस्टचे तज्ज्ञ विवेक भोईटे, संतोष कारंजे, ओंकार ढोबळे, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे आदींनी वेगवेगळ्या पिकांच्या बाबत माहिती देत आहेत. तूर, बाजरी, मका, उडीद या पिकांबरोबरच कांदा लागवड, फळबागांमध्ये आंबा, लिंबू याबाबतही मार्गदर्शनही करण्यात येत आहे. पांडुरंग फुंडकर कृषी योजनेंतर्गत फळबाग लागवड, एन. एच. एम. शेततळे, फळबाग, टॅक्टर, रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे व वैयक्तिक लाभाच्या योजनांची तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे शेतकऱ्यांना माहिती देत आहेत. आमदार पवार यांनी मागील काही दिवसांत कर्जत व जामखेड तालुक्यांच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. मतदारसंघातील शेतीची उत्पादकता वाढावी, शेतीचा दर्जा सुधारावा, यासाठी चर्चासत्र घेण्याचा आग्रह त्यांनी यावेळी धरला होता. त्यानुसार हे अभियान राबवण्यात आले.