स्थैर्य, जालना, दि.३: केंद्राच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून ज्या शाळांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थी असतात, त्यांना वार्षिक प्रत्येकी दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. ठाणे जिल्ह्यात मुलांची खोटी पटसंख्या दाखवून निधी हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने मंगळवारी जिल्ह्यातील ३० शाळांच्या अर्जांची पडताळणी केली असता ३७० विद्यार्थ्यांचे बोगस अर्ज आढळून आले. यंदाचे एकूण नवीन १७,५७० अन् नूतनीकरणाचे २०५९० असे एकूण ३८ हजार १६० अर्ज आहेत. खोटी पटसंख्या दाखवून लाखो रुपये हडपण्याचा हा प्रकार असल्याचे समोर आले आहे.
केंद्राच्या अल्पसंख्याक शिष्यवृत्ती या योजनेच्या माध्यमातून पहिली ते नववीपर्यंतच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. या माध्यमातून जवळपास वर्षभरात प्रत्येकाला दहा हजार रुपये दिले जातात. २०१७ पासून ही योजना देशभर सुरू आहे. अल्पसंख्याक शिष्यवृत्ती योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या आणि खासगी अनुदानित शाळेत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते नववीच्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो. योजनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या खात्यात किमान दहा हजार रुपये वर्षाला जमा होतात. शासनाकडून दरवर्षी ऑनलाइन होत असलेल्या संच मान्यता अन् यू-डायस या वेळी शाळा तसेच विद्यार्थ्यांची नोंदणी घेतली जाते. ठाणे जिल्ह्यात या योजनेत काही मुलांची खोटी पटसंख्या दाखवून तिच्या माध्यमातून निधी हडपण्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी आशा गरुड, उपशिक्षणाधिकारी नागेश मापारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विस्तार अधिकारी नारायण कुमावत, जिल्हा नोडल अधिकारी पी. एस. रायमल, तालुका नोडल अधिकारी कल्याण गव्हाणे, लक्ष्मण मोरे यांना शाळानिहाय अर्जांची तपासणी करण्याचे काम ५ तारखेपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे.
शाळेचा क्यूआर कोड हॅक करून पैसे लाटण्याचा प्रयत्न
संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाबरोबर शिक्षण विभागाने संपर्क साधून विचारणा केली असता, त्या शाळेने अशा प्रकारच्या योजनेकरिता अर्जच केले नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराची अधिक चौकशी केली असता शाळेचा क्यूआर कोड हॅक करून त्या माध्यमातून अधिकची पटसंख्या दाखवून पैसे लाटण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. – आशा गरुड, शिक्षणाधिकारी, माध्यमिक
असे आहेत एकूण फाॅर्म अन् पडताळणी
– अद्याप दोन्ही प्रकारांतील पडताळणीचे १८५३२ अर्ज बाकी
– ३० शाळांच्या तपासणीतून आढळले बनावट ३७० अर्ज
– जिल्ह्यात या वर्षीचे एकूण नवीन अर्ज -१७५७०
– मागील नूतनीकरणासाठी असलेले एकूण अर्ज-२०,५९०
– व्हेरिफिकेशन करण्यासाठी दिलेली डेडलाइन ५ फेब्रुवारी