
दैनिक स्थैर्य । 11 एप्रिल 2025 । फलटण । फलटण तालुक्यातील विविध पाणी प्रश्नाच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवार, दि. १६ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. सदरील मिटिंग आयोजित करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे मागणी केलेली होती; त्यांच्या मागणीनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
निरा – देवधर व धोम बलकवडीच्या पाण्यावरून फलटण तालुक्यासह माळशिरस, सांगोला जिल्ह्यात मोठा पाणी प्रश्न पेटला होता. त्यानतंर मागे पुणे येथे संपन्न झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत सुद्धा याचे पडसाद उमटले होते. यामध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांची भेट घेतली होती. त्यावेळी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांनी “फलटणचे हक्काचे पाणी इतर कोणत्याही तालुक्याला देण्यात येणार नाही. काही जण बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करीत आहे” व्यक्त केले होते.
त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी निरा – देवधर व धोम बालकवडीच्या पाणी प्रश्नाच्या बाबत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे बैठक आयोजित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सदरील बैठक आयोजित करण्यात आली आहे.
सदरील बैठकीसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता यांच्यासमवेत सदरील विषयाशी निगडित असणारे सर्व मंत्रालयीन व क्षेत्रीय अधिकारी यांनी उपस्थित राहण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या कार्यालयाच्यामाध्यमातून देण्यात आलेल्या आहेत.