
स्थैर्य, 16 मार्च, सातारा : महाराष्ट्राचे लोकनेते आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे अचानक घडलेल्या दुर्घटनेत नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने अक्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला असून या दुःखातून सावरणे सर्वांनाच कठीण आहे. त्यामुळे दि. ३० मार्च २०२६ रोजी आपण वाढदिवस साजरा करणार नसल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जाहीर केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र हळहळला. एक अभ्यासू, मनमिळावू, हरहुन्नरी आणि सडेतोड स्वभावाचे धडाडीचे नेतृत्व काळाने आपल्यातुन हिरावून नेले. अजितदादांच्या अकाली जाण्याने सर्वांनाच जबर धक्का बसला आहे. अजितदादा आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच करवत नाही, अजूनही या दुःखद घटनेवर कोणाचाही विश्वास बसत नाही. अजितदादा हे केवळ माझे मित्रबंधूच नव्हे तर, मार्गदर्शक होते. माझ्या राजकीय, सामाजिक जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच माझ्या सातारा- जावली मतदारसंघाच्या तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे, ही बाब कोणीही विसरू शकत नाही.
केवळ माझ्याच नव्हे तर, दादांवर प्रेम असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेचा विचार करून दि. ३० मार्च रोजी असलेला माझा वाढदिवस मी साजरा करणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. त्यामुळे माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने, कार्यकर्त्याने आणि जनतेने माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करु नये. वाढदिवसानिमित्ताने कोणत्याही प्रकारचे फ्लेक्स, फलक अथवा बॅनरबाजी करू नये, असे विनम्र आवाहन सर्वांना करत आहे, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.

