
दैनिक स्थैर्य । 21 एप्रिल 2025। सातारा ।पर्यटन, उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक हे महाबळेश्वर दौ-यावर होते. यावेळी मधाचे संग्रहालय व विक्री केंद्रास आणि महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रादेशिक कार्यालयास भेट दिली. तसेच त्यांनी महाबळेश्वर येथील निसर्गरम्य परिसराची आणि प्राचीन मंदिरांची पाहणी केली.
प्रथमतः त्यांनी पाच नद्यांचा संगम असणार्या पंचगंगा मंदिरात जाऊन दर्शन घेतले व मंदिराची पाहणी केली. त्यानंतर जुने महाबळेश्वर मधील हेमाडपंथी वास्तुशैली असणार्या व प्राचीन शिवमंदिर म्हणून ओळखले जाणार्या महाबळेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या वैशिष्टपूर्ण मंदिराची पाहणी केली. कृष्णा नदीच्या उगमस्थानी वसलेल्या कृष्णामाई मंदिरात जाऊन देवीची पूजा केली व मंदिराची पाहणी केली.
या सर्व भेटीनंतर मधाचे संग्रहालय व विक्री केंद्र असणार्या मधुसागर केंद्रास भेट दिली. तसेच मध उद्योगास चालना मिळावी म्हणून स्थापन केलेल्या मध संचालनालयाच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी मध उत्पादन, मध विक्री व मध संकलन यासंबधी माहिती जाणून घेतली. तसेच मधासंदर्भात स्थानिक व्यवसाय व स्थानिक उत्पादने यांची माहिती घेऊन व्यवसायिकांना प्रोत्साहन दिले. महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण उद्योगांना चालना देणार्या आणि स्थानिक कारागिरांना बळ देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ स्थापन करण्यात आले आहे. या मंडळाच्या महाबळेश्वर येथील प्रादेशिक कार्यालयाला भेट दिली.यावेळी खादी आणि ग्रामीण उद्योगातून बनलेल्या वस्तूंच्या उत्पादनाची माहिती घेतली.
यावेळी ते म्हणाले, थंड हवेचे ठिकाण’ किंवा ’गिरीस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर व पाचगणी या ठिकाणी देश-विदेशात दरवर्षी असंख्य पर्यटक भेट देत असतात. याच पद्धतीने महाराष्ट्रातील इतर पर्यटन स्थळांचे ब्रँन्डिग करुन त्याठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक कसे येतील याचाही पर्यटन विभागाचा मंत्री या नात्याने या दौ-यात पाहणी करुन व माहिती घेऊन अभ्यास केला. याप्रसंगी महाबळेश्वरच्या तहसीलदार श्रीमती तेजस्विनी खोचरे पाटील,विशाल जाधव, तलाठी सागर शिंदे व कर्मचारी उपस्थित होते.