स्थैर्य, सातारा, दि.०२: कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हा प्रशासनाने जे-जे निर्बंध घातले आहेत त्या निर्बंधाची जिल्ह्यात प्रभावी अमंलबजावणी करा, अशा सूचना गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.
येथील शासकीय विश्रामगृहात कोरोना संसर्गाबाबत बैठक गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला पोलीस अधीक्षक अजकुमार बन्सल यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते.
रात्री 8 नंतर हॉटेल, रेस्टॉरंट उघडे राहणार नाहीत तसेच हॉटेल व रेस्टॉरंटमध्ये शासनाने व प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळतात याची तपासणी संबंधित पोलीस स्टेशनने करावी. ज्या ठिकाणी नियमांचे उल्लेघन होत असेल त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करावी. बाजार पेठ, गर्दी होणाऱ्या ठिकाणी नागरिक मास्कचा वापर करत नसतील तर त्यांच्यांवर दंडात्मक कारवाई करावी. नगर पालिका क्षेत्रात मोठ्या दुकानदारांनी कोरानाची टेस्ट करुनच दुकानात बसण्याबाबत सांगावे. तसेच सायंकाळी मार्केटमध्ये रात्री 8 वाजता दुकान बंद करावे, असे माईकद्वारे पुकारुन सांगावे . तसेच पोलीस विभागाचे कोरोना केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत करावे.
प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, वेळोवेळी हाताची स्वच्छता राखून कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे, असे आवाहनही गृह (ग्रामीण) राज्यमंत्री श्री. देसाई यांनी या बैठकीत केले.