दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । पाटण । पाटण विधान सभा मतदार संघातील अतिवृष्टीने बाधित असलेल्या दरडप्रवण क्षेत्रातील खरडून गेलेल्या शेतीचे बांध-बंदीस्तीकरण, सपाटीकरण हे काम लोकसहभाग व विविध अशासकीय संस्था, शासकीय विभाग यांच्या सहभागातून करण्याबाबत तसेच इतर विविध कामांचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल तसेच जिल्ह्यातील व पाटण तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी, पाटण मतदार संघातील अतिवृष्टीने बाधित असलेल्या दरडप्रवण क्षेत्रातील खरडून गेलेल्या शेतीचे बांध-बंदीस्तीकरण, सपाटीकरण हे काम लोकसहभाग, विविध अशासकीय संस्था, शासकीय विभाग यांच्या सहभागातून करुन घेण्यात येणार आहे. यासाठी जेसीबी, पोकलेन, डंपर, ट्रॅक्टर यांच्यासाठी शासनातर्फे डिझेल देण्यात येणार आहे.
या बैठकीत मौजे विहे ता. पाटण येथील गावठाण नवीन वसाहत नगर भूमापनचे उताऱ्यावर महाराष्ट्र शासनाच्या नोंदीबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच सुरक्षा रक्षक महामंडळ अंतर्गत बाह्य यंत्रणेद्वारे शासकीय कार्यालयांत कंत्राटी सुरक्षा रक्षक पुरविणे तसेच सुझलॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांची इतर राज्यात बदली केलेबाबत यासह अन्य विषयावर चर्चा करण्यात येऊन संबंधीत विषयात सकारात्मक निर्णय घेण्याचे यावेळी ठरले .