राज्यातील पत्रकारांना ‘फ्रंटलाईन वर्कर्स’चा दर्जा देऊन त्यांचे तातडीने लसीकरण करण्याची पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १२: राज्यातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा व त्यांचे तातडीने लसीकरण करण्यात यावे अशी मागणी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात श्री.पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.

मार्च २०२० पासून देशभरात कोविड १९ या विषाणूचा संसर्ग आहे. कोविड १९ चा संसर्ग वाढत असताना राज्यातील आरोग्य कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत. या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच विविध वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर व प्रतिनिधी हे देखील बातम्यांच्या वृत्तांकनासाठी कार्यरत असतात. प्रत्येक जिल्हा, तालुका व गावाची
कोविड-१९ च्या संसर्गाबाबतची सद्यस्थिती विविध माध्यमाद्वारे शासनास अवगत करण्याचे काम करत असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे देशातील इतर काही राज्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेतला आहे, त्याप्रमाणे आपणही आपल्या राज्यात पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा देऊन त्यांना तातडीने कोविड प्रतिबंधक लस देण्यात यावी, अशी विनंती मंत्री श्री. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.


Back to top button
Don`t copy text!