अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट


दैनिक स्थैर्य । दि. ०१ जुलै २०२३ । सोलापूर । अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व संसदीय कार्यमंत्री तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष नामदार चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील (मंत्री दर्जा), महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश मोहिते तसेच महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत प्रामुख्याने मराठा समाजाकरिता कार्यरत असणाऱ्या व्याज परतावा योजनांची सविस्तर माहिती, योजनांची कार्यपध्दती यांची माहिती यावेळी सादर करण्यात आली. यावेळी मंत्री महोदयांनी संगणकावर प्रत्यक्षात LOI निर्माण करण्याची प्रक्रिया, कर्ज मंजुरीची प्रक्रिया, व्याज परतावा कशा प्रकार देण्यात येतो, याची प्रक्रिया सविस्तर समजून घेतली व ४,३३३ लाभार्थ्यांना रु. ३ कोटी ७५ लाख व्याज परताव्याची रक्कम स्वत: वितरीत केली व महामंडळाच्या योजनांतर्गत आजपर्यंत ६१,४११ लाभार्थ्यांना बँकेने वितरीत केलेल्या रु. ४,३६७ कोटीच्या कर्ज रकमेबाबत व महामंडळाने ५०,२८५ लाभार्थ्यांना व्याज परतावा स्वरुपात वितरीत केलेल्या रु. ४५६ कोटी रक्कमेचे अवलोकन करुन महामंडळाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.

मुख्यालयात भेट दिल्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महामंडळाकरिता लवकरच नवी मुंबईसारख्या शहरामध्ये भव्य इमारतीकरिता जागा उपलब्ध करुन देण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करण्याची ग्वाही दिली.


Back to top button
Don`t copy text!