दैनिक स्थैर्य | दि. 01 जानेवारी 2025 | सातारा | सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयाची पाहणी केली आणि रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य सुविधा प्रदान करण्याचे निर्देश दिले. मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले की रुग्णालयात येणारे प्रत्येक रुग्ण खासगी रुग्णालयात पाठवू नये तर त्यांना तिथेच चांगले उपचार दिले पाहिजेत. रुग्णालयाची स्वच्छता वाढविण्यावरही त्यांनी जोर दिला.
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब आणि गरजू रुग्ण येत असतात. या रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा देण्याबरोबरच त्यांच्यावर चांगले उपचार करावेत, असे मंत्री आबिटकर यांनी निर्देशित केले. रुग्णालयात कामासाठी येणाऱ्या कर्मचार्यांना हेलपाटे मारायला लावू नये, त्यांची कामे तातडीने पूर्ण करावीत, असेही त्यांनी सांगितले. समाजसेवक अधिक्षकांनी रुग्णांसाठी असणाऱ्या हक्कांची आणि सुविधांची माहिती देण्याबरोबरच, रुग्णांना लवकरात लवकर उपचार कसे मिळतील यासाठी काम करावे, असे निर्देश दिले.
रुग्णांना देण्यात येणारे जेवणाची तपासणी करून जेवणात आणखी पोषक पदार्थ वाढवावेत, असेही मंत्री आबिटकर यांनी सांगितले. रुग्णालयात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची वैद्यकीय प्रतिपुर्ती प्रमाणीकरणासाठी येणारी देयके वेळेत प्रमाणित करून द्यावीत, यावरही त्यांनी भर दिला.