
स्थैर्य, मायणी, दि. 27 : चितळीकर ग्रामस्थांनी आपल्यावर नेहमीच विश्वास दाखविला. त्यामुळे चितळीतील प्रत्येक गल्ली, वाडीवस्तीवर कोट्यवधींची कामे केली. त्याचाच एक भाग म्हणून आज मोहिते मळा येथे नवीन पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ करताना मनस्वी समाधान होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगेंनी दिले.
यावेळी पंचायत समिती सदस्य हिराचंद पवार, सरपंच प्रतिनिधी संतोष पवार, यशोवर्धन पवार, ॠत्विक गुदगे, रणजित माने, दादासाहेब कचरे उपस्थित होते.
यावेळी गुदगे म्हणाले, चितळीतील प्रत्येक गल्ली, वाडीवस्तीवर कोट्यवधींची कामे झाली आहेत. त्यात बंधारे, सभामंडप, अंगणवाडी व प्राथमिक शाळा इमारत, साकव, आरोग्य उपकेंद्र, पशुसंवर्धन केंद्र, रस्ते, सिमेंट क्राँक्रीटीकरण आदी कामांचा समावेश आहे. मोहिते मळ्यातील ग्रामस्थांनी आपल्याकडे पाणीयोजनेची मागणी केली होती. त्यासाठी विहीर खोदून व पाणीपुरवठा करणे हाच एकमेव पर्याय होता. ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 15 लाखांचा निधी आपण मंजूर करून घेतला. या कामाचा शुभारंभ होत असल्याने मनस्वी समाधान होत आहे. सध्या विहिरीच्या जागेत भूजल पातळी वर असल्याने योजनेस पाणी कमी पडणार नाही तर टंचाईच्या काळात विहिरीजवळच्या तलावात उरमोडीचे पाणी सोडून ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. या विहिरीसाठी जनार्दन मोहिते यांनी जागा दिल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. चितळी हे विकासाची पाठराखण करणारे असून जिल्ह्यात चितळीला विकासकामात कायम अग्रेसर ठेवणार असल्याचेही गुदगे म्हणाले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन पाटील, संभाजी मंडले, अजित मोहिते, हरिभाऊ मोहिते, अनिल निकम, मालोजी पवार, संपत पवार,महेश पुंडेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.