दैनिक स्थैर्य । दि.१३ एप्रिल २०२२ । सातारा । सातारा शहरातील सातारा शहर पीठ गिरणी मालक संघाच्यावतीने दळणाच्या किमतीमध्ये एक रुपया वाढ झाल्याचे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
सातारा शहर पीठ गिरणी मालक संघाची बैठक मंगळवारी सकाळी 11 वाजता येथील स्नेहदीप हॉल मंगळवार पेठ येथे पार पडली. या बैठकीमध्ये वीज महामंडळाकडून आलेली डिपॉझिट बिले, तसेच व्यवसायातील अनेक अडचणी, वाढती महागाई, गिरणी ला लागणाऱ्या स्पेअर पार्टच्या वाढत्या किमती या सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली. वाढत्या वीज बिलामुळे गिरणी व्यवसायाचे पुरते कंबरडे मोडले आहे, अशी खंत गिरणीमालक संघाच्या सदस्यांनी व्यक्त केली. या अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्येक दळणामागे नेहमीच्या किमतीमध्ये एक रुपया वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्वारी गहू बाजरी यांच्या दरामध्ये प्रतिकिलो एक रुपयाची वाढ ही एक मे पासून लागू करण्यात येणार आहे, असे सातारा शहर पीठ गिरणी मालक संघाचे अध्यक्ष आनंद माने यांनी कळवले आहे. उपाध्यक्ष मुकुंद सोहोनी, सचिन सर्जेराव मोरे, खजिनदार ठोंबरे या बैठकीला उपस्थित होते.