
दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । सातारा । सैन्य दलाचा बनावट युनीफॉर्म, ओळखपत्र वापरुन अधिकारी असल्याचे भासवून सैन दलात नोकरी लावतो असे अमिष दाखवुन युवकांची लाखो रुपयांची फसवणुक करणार्या तोतया सैन्य अधिकार्यास स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.
याबाबत माहिती अशी, दि. 4 रोजी कानवडी, ता. खंडाळा येथील एक इसम सैन्यदलात नोकरीत नसतानाही भारतीय सैन्यदलाचा गणवेष घालून माण खटाव परिसरातील युवकांना सैन्यदलामध्ये भरती करतो, असे अमिष दाखवून पैशाची मागणी करुन त्यांची फसवणुक करत आहे, अशी माहिती भारतीय सैन्यदलास मिळाल्याने त्यांनी ही माहिती अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिली.
याचे गांभीर्य लक्षात घेवून त्यांनी भारतीय सैन्य दलाच्या अधिकार्यांसोबत जावून नमुद इसमास ताब्यात घेण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या. त्याप्रमाणे एलसीबीचे पथक व सैन्य दलाचे अधिकारी यांनी संयुक्त कारवाई करुन संशयिताचा शोध सुरू केला.
सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यातील काही युवकांना भरती करणेचे अमिष दाखवून त्यांची फसवणूक केली असल्याची माहिती या पथकास मिळाली. त्याप्रमाणे पथकाने फसवणुक झालेल्या युवकांना पोलीस स्टेशनला जावुन गुन्हे दाखल करणेस सांगीतले. त्याप्रमाणे 1) सचिन सुभाष खरात रा. सिंधी बु . ता.माण यांनी दिले फिर्यादीवरुन दहिवडी पोलीस स्टेशन येथे 2) मनिषा मनोज निकाळजे, रा. डांबेवाडी, ता. खटाव यांनी दिले फिर्यादीवरुन वडूज पोलीस स्टेशन येथे व 3) आप्पासाहेब भिकु जानकर रा. शिंगाडवाडी, ता. खटाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वडुज पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यानच्या संशयित त्याच्या गावामध्ये आला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्याने माण व खटाव भागातील मुलांना सैन्यदलामध्ये असल्याचे भासवून त्यांना सैन्यदलामध्ये नोकरी लावण्याचे अमिष दाखवुन वेळोवेळी पैसे घेतलेले असल्याची कबुली दिली. तसेच युवकांना व त्यांच्या पालकांना सैन्यदलात नोकरीला असल्याची खात्री पटण्याकरीता सैन्यदलाचा गणवेश घालुन त्यांचेकडे जावुन नोकरी लावणेकरीता पैशाची मागणी केलेली असल्याचे सांगितले. हा सैन्यदलाचा गणवेश, सैन्यदलाचे ओळखपत्र व सैन्यदलाचे गाडी चालविण्याचे लायसन्स हे सर्व बनावट असल्याचेही सांगितले. त्यास पुढील कार्यवाहीकामी दहिवडी पोलीस ठाण्याचे ताब्यात दिले असून गुन्हयाचा पुढील तपास
स.पो.नि. संतोष तासगवाकर दहिवडी पोलीस स्टेशन हे करीत आहेत. आरोपीस न्यायालयासमक्ष हजर केले असता त्याची 7 दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्हाडे यांच्या सुचनांप्रमाणे एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस अंमलदार उत्तम दबडे, तानाजी माने, विश्वनाथ सपकाळ, संतोष सपकाळ, शरद बेबले, मंगेश महाडीक, प्रविण फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, गणेश कापरे, अजित कर्णे, निलेश काटकर, शिवाजी भिसे, स्वप्नील माने, केतन शिंदे, रोहित निकम, सचिन ससाणे, पृथ्वीराज जाधव, प्रविण पवार, शिवाजी गुरव व भारतीय सैन्य दलाचे अधिकारी यांनी ही कारवाई केली आहे .
अनेक युवकांकडून लाखो रुपये उकळले
आरोपीने सैन्यदलात नोकरी लावतो असे सांगुन नोकरी लावण्यापुर्वी 4 लाख 50 हजार रुपये व नोकरी लावल्यानंतर 4 लाख 50 हजार रुपये असे एकूण 9 लाख रुपये दयावे लागतील असे सांगून अनेक युवकांकडून निम्म्या प्रमाणात रक्कम स्विकारुन त्यांची फसवणूक केली आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी जिल्हयातील नागरीकांना आवाहन केले आहे की, ज्या कोणाची फसवणूक झाली आहे त्यांनी नजिकच्या पोलीस स्टेशनला जावून कायदेशीर तक्रार नोंद करावी.