
फलटण राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मिलिंद नेवसे यांनी राजे गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला.
स्थैर्य, फलटण, दि. ०९ डिसेंबर : फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून राजे गटाला (शिवसेना) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक मिलिंद राजाराम नेवसे यांनी राजे गटाला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.
दिग्गजांच्या उपस्थितीत प्रवेश
मिलिंद नेवसे यांचा पक्षप्रवेश महायुतीचे नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, भाजप तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे, जाधववाडीचे माजी सरपंच मुनिष जाधव आणि विजय कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिलिंद नेवसे हे फलटणच्या राजकारणातील एक अनुभवी चेहरा मानले जातात. त्यांनी सुमारे १२ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद सांभाळले आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपची शहरातील ताकद वाढली असून राजे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
मिलिंद नेवसे यांची राजकीय कारकीर्द:
- २००६ ते २०११: बिनविरोध नगरसेवक म्हणून काम.
- २०११ ते २०२३: फलटण शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष (सलग १२ वर्षे).
- २०२३ ते २०२४: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ओबीसी सेलचे सातारा जिल्हाध्यक्ष.
- २०२४: जिल्हास्तरीय दक्षता समिती (गृह विभाग), सातारा जिल्हा येथे अशासकीय सदस्य म्हणून निवड.
नेवसे यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजपचे पारडे जड झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

