दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२१ । फलटण । मिलींद नेवसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून फलटण शहराध्यक्ष म्हणून पक्षासाठी उत्तम संघटनात्मक काम केले आहे. आता ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याने त्यांची जबाबदारी वाढली आहे. या पदाच्या माध्यमातून ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यात ते नक्कीच यशस्वी होतील, असा विश्वास महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण शहराध्यक्ष मिलींद नेवसे यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल मुंबई येथील विधानपरिषद सभापतींच्या दालनात नेवसे यांचा सत्कार संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, खासदार सौ.सुप्रिया सुळे, आ.हेमंत टकले, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बालबुद्धे, प्रदेश चिटणीस राजा राजापुरकर, फलटण नगरपालिकेचे नगरसेवक अजय माळवे, कृष्णाथ उर्फ दादासाहेब चोरमले यांची उपस्थिती होती.
सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मिलींद नेवसे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ओबीसी संघटना मजबूत ओबीसी बांधवांना सोबत घेवून काम करावे; असे ना.अजितदादा पवार यांनी सांगीतले.
खा.सौ.सुप्रिया सुळे म्हणाल्या, या निवडीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यामध्ये ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मिलींद नेवसे यांनी कार्यरत रहावे.
ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार मिलींद नेवसे यांची ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. ते नक्कीच उत्तम काम करतील अशी खात्री असल्याचे ईश्वर बालबुद्धे यांनी नमूद केले.