आभासी जग तयार करण्यासाठी फेसबुकने उचललेले मोठे पाऊल म्हणजेच “मेटा”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


फेसबुकने नुकतेच आपले नाव बदलून मेटा असे नामकरण केलेले आहे. फेसबुकने आपले नाव बदलून मेटा नाव केल्याने आपल्या दैनंदिन वापरांमध्ये असलेल्या फेसबूक, व्हाट्सअप, इंस्टाग्राम याच्यासह सोशल मीडिया अँप्स वापरताना काही बदल होणार की आपले जसे आहेत त्याच पद्धतीने ॲप्स सुरू राहणार याबाबत अनेक जणांच्या मनामध्ये विविध प्रश्न तयार झालेले आहेत. परंतु आपल्या दैनंदिन वापरामध्ये असलेल्या ॲप्स मध्ये सध्या तरी कोणताही बदल होणार नाही. परंतु आगामी काळामध्ये आभासी जगामध्ये जाण्यासाठी किंबहुना एक नवे आभासी जगच तयार करण्यासाठी फेसबुकने उचललेले हे मोठे पाऊल आहे. फेसबुकने “मेटा” या नावाने आपली कंपनीचे नाव करून कोणत्या पद्धतीने पाऊल उचलले आहे, त्याचा थोडक्यात आढावा घेतलेला आहे दैनिक स्थैर्यचे संपादक प्रसन्न रुद्रभटे यांनी …..

फेसबुकची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांमध्ये लगेचच फेसबुकला एवढी लोकप्रियता मिळाली की संपूर्ण जगाने फेसबुकला आपल्या डोक्यावर घेतले. दैनंदिन जीवनात आपण वावरत असताना लहान सहान गोष्टी सुद्धा फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर करणे हे तर अनेक सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत नित्याचेच बनलेले आहे. फेसबुक विस्तार करत असताना फेसबूकने काही वर्षांपूर्वी इंस्टाग्राम हे फोटोसेशन साठी असलेले ॲप किंवा फोटो प्रेमींसाठी असलेले ॲप सुरू केले. इंस्टाग्राम या ॲप मध्ये फोटो असणे महत्त्वाचे असते. त्याशिवाय इंस्टाग्रामवर पोस्टच तयार होत नाही. काही काळामध्ये फेसबुकच्या पाठोपाठ सर्वसामान्य नागरिकांच्या इंस्टाग्राम सुद्धा चांगलेच अंगवळणी पडलेले आहे. फेसबूकच्या आधी आता इंस्टाग्राम वर दैनंदिन करत असलेल्या घडामोडी शेअर करण्याचे प्रमाण जास्त आहे. इंस्टाग्राम ॲप द्वारे तरुण वर्ग हा आपल्याकडे खेचण्यामध्ये फेसबुकला यश आले. त्यानंतर जर सांगायचे गेले तर जगामध्ये पर्सनल मेसेजिंगसाठी व्हाट्सअप हे ॲप उदयास आलेले होते. या आपची लोकप्रियता वाढत असतानाच फेसबुकने व्हाट्सअप हे ॲप सुद्धा विकत घेतले व व्हाट्सअप च्या माध्यमातून फेसबुक व इंस्टाग्रामला कसा फायदा होईल, व्हाट्सअपद्वारे ही मुख्य कंपनीला कसा फायदा होईल यावर कंपनीने भर दिला. एखादी कंपनी आपल्या फायद्यासाठी एखादी गोष्ट करत असते, हे नक्की आहे. परंतु फेसबूक एक अशी गोष्ट बनत चालली आहे की सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्येक गोष्टी त्यांच्याकडे जात चाललेल्या आहेत.

टेक्नॉलॉजीमुळे जग ज्याप्रमाणे जवळ येत आहेत, त्याच प्रमाणामध्ये माणसे एकमेकांपासून दुरावत चाललेली आहेत. पूर्वीच्या काळामध्ये जर कुणाला भेटायला जायचे असेल तर एखाद्याला पत्र लिहून अथवा थेट त्याच्या घरी माणसे भेटायला जात होती. त्यानंतर संपूर्ण जगामध्ये टेलीफोनने निरोप पोचवण्याची त्वरित सुविधा निर्माण केली. टेलिफोन नाही सुद्धा निरोप त्वरित पोहोचत होते. परंतु संपूर्ण जग हे टेक्नॉलॉजीच्या बाबतीत सतत अपडेट व अपग्रेड होत आहे. त्यासोबत आपण सर्वांनी अपडेट व अपग्रेड होणे गरजेचे आहे. परंतु यासोबतच आपण सर्वांनी अपडेट होताना काही नियम स्वतःला घालून दिले पाहिजेत. सोशल मीडिया किंवा आता तयार होणाऱ्या आभासी जगाच्या बाबतीत काही मर्यादांच्या पुढे जावून किंवा त्याच्या आहारी जावून आपण वापर करणे हे गैरच ठरणार आहे. आताच आपल्या राज्यासह देशामध्ये सायबर क्राईम ब्रँच कार्यरत आहे. पूर्वीच्या काळामध्ये ज्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष गुन्हे घडत होते, आता त्या प्रमाणात किंवा त्याहून अधिक गुन्हे हे ऑनलाइन घडू लागले आहेत. आपल्याला काही आमिषे वैगरे दाखवून आपल्याला आपल्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगायला भाग पाडतात. त्यानंतर काही वेळातच आपले बँक अकाउंट वर डल्ला पडलेला असतो. अश्या प्रकारच्या तक्रारी आता फलटण सारख्या ठिकाणी सुद्धा घडून लागेलेले आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी सावध राहूनच आभासी जगामध्ये वावरले पाहिजे.

फेसबुकने स्वतःचे चे नाव बदलून मेटा ही कंपनी सुरू केल्याने मेटा कंपनीद्वारे वापरकर्त्यांना थ्रीडी अनुभव मिळणार आहेत. म्हणजेच आगामी काळामध्ये आपण डोळ्यावर चष्मा किंवा एखादा बॉक्स लावून आपण एखादी गेम खेळू शकणार आहोत. आपण एखाद्या ठिकाणी किंवा पाहिजे त्या ठिकाणी आभासी जगामध्ये जाऊ शकणार आहोत. फलटणमधील माझ्या घरी राहून मी कॅलिफोर्निया मध्ये काय चालले आहे. किंवा कॅलिफोर्नियामधील रस्त्यावरून मी आभासी जागाद्वारे फिरू शकणार आहे. या अभ्यास जगामध्ये वापरण्यासाठी पुढील काळामध्ये आभासी करन्सी सुद्धा येईल. तुम्हाला बिटकॉइन वैगरे माहित असेल तर तुम्हाला आभासी करन्सी बाबत जास्त सांगायची आवश्यकता नाही. बिटकॉइन हि एक आभासी करन्सीच आहे. फेसबूकने आभासी करन्सी या आधीच विचार करून ठेवला असेल. फेसबुकने मेटा हे नाव धारण केल्याने आगामी काळात फक्त कंपनीचे नाव बदलले गेले नाही. तर कंपनीची पुढील वाटचाल सुद्धा कोणत्या प्रकारे असणार आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेले आहे. आता ह्या सर्व बरोबरच आभासी जग तयार झाले तर आभासी जगामधून आपल्याला बाहेर येता येईल का ? आभासी जगामध्ये आपण जर प्रवेश केला किंवा आभासी जगामध्ये आपल्याकडून एखादी चूक घडली तर ती चूक दुरुस्त करता येईल का ? असे अनेक प्रश्न आता सध्याच्या घडीला मनामध्ये उपस्थित राहत आहेत. आगामी काळ नक्की कोणत्या दिशेने जात आहे हे पाहूनच पुढील पावले उचलणे गरजेचे आहे.

आत्ताच्या माझी पिढी ही शेवटचीच पिढी असेल की त्या पिढीने मैदानी खेळ शालेय जीवनापासून खेळले आहेत. शाळा सुटल्यानंतर किंवा सुट्टी मध्ये मोबाईल हातात न धरता मैदानी गेम किंवा घरच्यांसोबत बसून घरगुती खेळ हे खेळले जात होते. आत्ताच्या काळामध्ये आई-वडीलच लहान मुलांच्या हातात आताच मोबाईल देतात व कौतुकाने सांगत असतात की ह्याला युट्युब ओपन करून पाहिजे ते गाणं व्यवस्थित लावता येतं. ह्याला चांगला फोटो काढता येतो. परंतु लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊन आपण त्यांचे बालपण तर हिरावून घेत नाही ना ? हा प्रश्नसुद्धा पालकांच्या मनामध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे. लहान मुलांच्या हातात मोबाइल दिल्यानंतर त्याचे त्यांना एवढी सवय होती की नंतर पालकांनी कितीही ठरवले की, मुलाकडून मोबाईल काढून घ्यायचा आणि त्याला अभ्यासाला किंवा खेळायला पाठवायचे, तरीही ते शक्य होत नाही. मुले आकाश पाताळ एक करून शक्य त्या थराला जाऊन मोबाईल परत मिळवतातच लहान मुलांना सुद्धा आता आपल्याच आई-वडिलांना काय बोलले की, ते आपल्याला मोबाईल देतात किंवा आपण काय केले की आपल्याला मोबाईल मिळतो, हे आता माहीत झालेले आहे. त्यामुळे आपण आपल्या घरातील मुलांवर कोणत्या पद्धतीने संस्कार करतो संस्कार हा शब्द येथे मुद्दामच वापरात आहे. कारण पालक ज्या प्रमाणे मुलांशी वागतात त्याच प्रमाणे मुले सुद्धा इतर सर्वत्र वागत असतात. मुले लहान असताना पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवणे गरजेचे आहे. सरतेशेवटी मुलांनी जर लहान वयातच आभासी जगामध्ये आपले स्थान निर्माण केले तर त्यांना खऱ्या जीवनातील छोटे मोठे आनंद मिळतील का ? आपल्या प्रमाणे ह्या मुलांचे मित्र मैत्रिणी असणार का ? असे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. आता या सोबत अनेक प्रश्नांची उत्तरे हि काळाच्या पोटातच लपलेली आहेत.

– प्रसन्न दिलीप रुद्रभटे,

संपादक, दैनिक स्थैर्य.


Back to top button
Don`t copy text!