सन २०२१-२२ चे गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०३ मे २०२३ । मुंबई । महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत राज्याचे कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी सन २०२१-२२ च्या गुणवंत कामगार पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात कामगार भूषण पुरस्कारासाठी टाटा मोटर्स लिमिटेड, पिंपरी, पुणे येथील कर्मचारी मोहन गोपाळ गायकवाड यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.

गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी ५१ कामगारांची निवड करण्यात आली आहे. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड, पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय कामगार सन्मान सोहळ्याप्रसंगी या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

नोकरी करत असतानाच सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, संघटन आदी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी मंडळातर्फे १९७९ पासून गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार देऊन गौरविले जात आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाकडे नोंदीत असलेल्या आणि आस्थापनेत कमीत कमी ५ वर्षे सेवा झालेल्या ५१ कामगारांना दरवर्षी हा पुरस्कार देऊन गौरविले जाते. रु.२५ हजार, मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील किमान १० वर्षे विविध क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या एका कामगाराची दरवर्षी कामगार भूषण पुरस्कारासाठी निवड केली जाते. रु.५० हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि पदक असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

गुणवंत पुरस्कारांची घोषणा कामगार दिनी करण्याचे निर्देश कामगार मंत्र्यांनी प्रशासनास दिले होते. त्यानुषंगाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन इतर आवश्यक प्रक्रिया तातडीने पार पाडत या पुरस्कारार्थींची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुरस्कार वितरण सोहळा मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळात कार्यरत अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ करण्याचे कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी जाहीर केले. मंडळाच्या शिवण वर्ग, शिशुमंदिर, ग्रंथालय आदी उपक्रमांत कार्यरत सुमारे ३९५ अर्धवेळ कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार श्रीमती उमा खापरे, श्रीमती अश्विनी जगताप, कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद – सिंगल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव विवेक कुंभार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, पुणे विभागाचे अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, कोकण विभागाचे अपर कामगार आयुक्त श्रीमती शिरीन लोखंडे, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक एम. आर. पाटील, बाष्पके संचालनालयाचे संचालक डी. पी. अंतापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!