
स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑगस्ट : फलटण शहर आणि परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या चिंताजनक पातळीवर वाढली असून, रस्तोरस्ती फिरणाऱ्या कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी प्रशासनाने धडक मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
शहरातील विविध भागांमध्ये दिवस-रात्र कुत्र्यांच्या टोळक्यांचा वावर दिसून येतो. अन्नासाठी होणारी भांडणे आणि मोठ्याने ओरडण्यामुळे परिसरात अशांतता निर्माण झाली आहे. अनेकदा ही कुत्री अचानक वाहनांच्या आडवी येत असल्याने अपघात घडत आहेत. रस्त्यावरून चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या आणि लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या महिलांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारही वाढले आहेत, त्यामुळे नागरिक, विशेषतः महिला आणि वृद्ध, जीव मुठीत धरून घराबाहेर पडत आहेत.
या मोकाट कुत्र्यांमुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीतीही पशुवैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कुत्र्यांची पैदास वाढत असून, आगामी काळात ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करेल, अशी चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी भावना संतप्त नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

