
सातारा, ता.10…भूमिअभिलेख कार्यालयातील मनमानी आणि निष्क्रिय कारभाराच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने टाळे ठोको आंदोलन करण्यासंदर्भात दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोरेगावचे प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी शुक्रवारी (ता. १२) सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे.
तालुक्यात ऊस गळीत हंगामास सुरुवात होऊन सुमारे महिनाभर कालावधी उलटला आहे. ऊसतोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतमोजणीसाठी भूमिअभिलेख कार्यालयात येणाऱ्या शेतकऱ्यांना मोजणी विलंब, मनमानी, कर्मचाऱ्यांची एकहाती सत्ता,अपमानास्पद वागणूक, भ्रष्टाचार व चुकीच्या मोजण्या अशा अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर कोरेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कोरेगाव तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांनी एका शिष्टमंडळासह कोरेगाव
भूमिअभिलेख कार्यालयातील कारभार तातडीने सुरळीत करावा अन्यथा कोरेगाव भूमिअभिलेख कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करण्याचा इशारा प्रांताधिकारी श्री. कुदळे, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना एक निवेदन देऊन दिलेला होता. या इशाऱ्याची दखल घेत शेतकऱ्यांच्या मोजणी आणि इतर प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी प्रांताधिकारी श्री. कुदळे यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रांत कार्यालयातील आपल्या कक्षात सर्व संबंधितांची बैठक बोलावली आहे.
त्यात भूमिअभिलेख विभागाचे सातारा आणि कोरेगावचे अधिकारी, कोरेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बल्लाळ, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा समावेश आहे. या बैठकीतून शेतकऱ्यांच्या मोजणीचे प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता असल्याने प्रांतांनी बोलावलेल्या या बैठकीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

