दैनिक स्थैर्य । दि.२२ मार्च २०२२ । मुंबई । दूध उद्योग जिवंत राहिला पाहिजे. यासाठी दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग मोठ्या प्रमाणावर उभे राहिल्यास मागणी आणि पुरवठा होऊ शकेल. खुल्या अर्थव्यवस्थेत आपण दूध उत्पादकांसमोर बंधने लादू शकत नाही. त्यामुळे दूध उत्पादनासंदर्भात एफआरपी देण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली असून याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली.
कोरोना काळात लॉकडाऊन वेळी दूध उत्पादकांकरिता दूध भुकटी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज 60 टक्के दुग्ध व्यवसाय हा खाजगी लोकांचा आहे. त्यामुळे दूध व्यवसाय करतांना विक्री किंमतीवर निर्बंध ठेवणे योग्य नाही. यावर पर्याय म्हणून दुग्धव्यवसायात प्रक्रिया करणारे उद्योग उभारणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री विक्रम काळे, सदाशिव खोत, महादेव जानकर यांनी विचारला होता.