
फलटण शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहांची निर्मिती, देखभाल आणि नियमित पाणीपुरवठ्याबाबत ॲड. जिजामाला नाईक निंबाळकर व मनीषाताई नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला नगरसेविकांची विशेष बैठक पार पडली. शहराच्या स्वच्छतेवर यात प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.
स्थैर्य, फलटण, दि. 13 मार्च : फलटण नगरपरिषदेमध्ये काही दिवसांपूर्वी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली शहराच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत महिलांचे अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले होते. याच पार्श्वभूमीवर आता सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर व युवा नेत्या सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व महिला नगरसेविका आणि प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
स्वच्छतागृहे आणि पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर मंथन
या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रामुख्याने फलटण शहरातील महिलांच्या मूलभूत समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरात महिलांसाठी पुरेशी आणि सुसज्ज स्वच्छतागृहे उभारणे हा या चर्चेतील मुख्य मुद्दा होता. तसेच, ही उभारत असलेली स्वच्छतागृहे कायमस्वरूपी स्वच्छ आणि सुस्थितीत राहावीत, यासाठी त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी ‘सुलभ शौचालय’ सारख्या अनुभवी एजन्सीकडे सोपवण्याबाबत सकारात्मक विचारमंथन करण्यात आले. यासोबतच, संपूर्ण फलटण शहरात नागरिकांना नियमित वेळेत आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी कोणत्या तातडीच्या उपाययोजना करता येतील, यावरही विस्तृत चर्चा करण्यात आली.
‘आपले शहर, आपले घर’ – स्वच्छतेसाठी कटिबद्धता
गेली अनेक वर्षे फलटण शहर स्वच्छतेच्या बाबतीत काहीसे मागे राहिले आहे. आता आपले फलटण शहर हे आपल्या घराप्रमाणेच स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शहरात ‘स्वच्छ भारत अभियान’ अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात यावे, यावर या बैठकीत एकमत झाले. फलटण शहर हे आपले घर आहे, त्यामुळे आपल्या घराची जबाबदारी ही आपणच घेणे गरजेचे आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. येणाऱ्या काही दिवसांत लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याशी या सर्व विषयांवर सविस्तर चर्चा करून तातडीने योग्य त्या उपाययोजना केल्या जातील, अशी ग्वाही ॲड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर व सौ. मनीषाताई नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.

शहराच्या विकासाला दिशा देणारी ही विशेष बैठक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात पार पडली. या बैठकीस सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, युवा नेत्या सौ. मनीषाताई समशेरसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले, नगरसेविका सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सौ. रुपाली अमोल सस्ते, सौ. मोहिनी मंगेश हेंद्रे, सौ. मिना काकडे यांच्यासह फलटण शहरातील विविध प्रमुख महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
