दैनिक स्थैर्य । दि.११ फेब्रुवारी २०२१ । सातारा । राज्य शासनाकडून जिल्हास्तरावरील व तालुकास्तरावील क्रीडा संकुलांना निधी मिळाला आहे तो वेळेत खर्च करावा व ज्या तालुक्यांना जागा प्राप्त नाही त्या तालुक्यांना जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या
सातारा जिल्हा क्रीडा संकुल समितीची बैठक पालकमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, कार्यकारी अभियंता संजय दराडे, सहायक अभियंता राहूल अहिरे यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलामधील 400 मिटर धावण मार्ग, इनडोअर हॉल, बास्केटबॉल कोर्ट, लॉन-टेनिस कोर्ट, जलतरण तलाव, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो मैदान, वसतिगृह, क्लब हाऊस इत्यादी सुविधा उभारण्यात आलेल्या असून त्या नागरिक व खेळाडूंकरिता खुल्या करण्यात आलेल्या आहेत.
जलतरण तलाव, बास्केटबॉल, लॉनटेनिस दुरुस्तीकरिता मान्यता प्रदान करुन, अद्ययावत सुविधा खेळाडूंकरिता लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच संकुलातील विविध सुविधा साफ-सफाई व स्वच्छतेकरिता विद्युत उपकरणे खरेदीकरिता मान्यता दिल्यामुळे सुविधांची स्वच्छता राखणे सोयीचे झालेले आहे. त्याचप्रमाणे जलतरण खेळासंबंधातील अद्ययावत क्रीडा साहित्य लवकरच खरेदी करण्याच्या सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे सुशोभिकरण व फर्निचर करण्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता दिल्यामुळे सुसज्ज असे कार्यालय व बैठक व्यवस्था निर्माण होणार आहे. तसेच या बैठकीमध्ये जलतरण तलाव दुरुस्ती व आवश्यक साहित्य खरेदी, स्वच्छतेकरिता विद्युत उपकरणे खरेदी, बास्केट बॉल, व लॉन-टेनिस मैदान दुरुस्ती व व्यापारी संकुलासमोरील मोकळ्या जागेचे सुशोभीकरण, संकुलातील सुविधांचे आरक्षण शुल्क निश्चित करणे या विषयांवर चर्चा करण्यात आली.