दैनिक स्थैर्य । दि. १९ डिसेंबर २०२१ । सातारा । केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या केंद्र पुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समितीची बैठक खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृह जिल्हा परिषद येथे संपन्न झाली.
यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अर्थ शिक्षण व क्रीडा समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, विविध विभागाचे अधिकारी व समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी खासदर श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्यात केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मिशन मोडवर काम करावे. केंद्र शासनाकडील योजनांसाठी आवश्यक तो निधी आणण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत लेखी स्वरुपात लवकरात लवकर निवेदन द्यावीत. विशेषत: रस्ते, वीज, पाणी याबाबतच्या समस्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणेने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्ह्यात केंद्र शासनाच्या राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. तसेच समितीच्या सदस्यांनी विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न मांडले.