दैनिक स्थैर्य । दि. ०८ सप्टेंबर २०२२ । सातारा । जिल्हा अग्रणी बँकेच्यावतीने जून 2022 तिमाही बँकर्स समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी बैठकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नरेंद्र कोकरे, बँक ऑफ महाराष्ट्राचे अंचल प्रबंधक विवेक नाचणे, नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक राजेंद्र चौधरी, अग्रणी बँक व्यवस्थापक युवराज पाटील, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सुषमा देसाई, जिल्हा उद्योग केंद्राचे उमेश दंडगवाळ, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत आदी. उपस्थित होते.
चालु वर्षीसाठी 8750 कोटीचा पतपुरवठा प्राथमिक क्षेत्रासाठी अग्रणी बँकेने तयार केला असून त्यापैकी राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खाजगी बँकांद्वारे 2592 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. सर्व बँकानी या वर्षात प्रत्येक तिमाहीत 100 टक्के उद्धिष्ठ पुर्ती साठी प्रयत्न करण्याविषयी बँकांना सूचना देण्यात आल्या. जून तिमाहीत खरीपासाठी 1414 कोटी चे कर्ज वाटप केले असून उद्दीष्टाच्या 72% काम बँकानी साध्य केले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व महामंडळाच्या जिल्हा समन्वयकांचा व बँकांचा आढावा घेतला. बँकेच्या ठेवी व कर्जे बाबत, नाबार्ड अंतर्गत येणा-या सर्व योजनांबाबत आढावा घेऊन, नवीन राष्ट्रीय ग्रामीण जीवन उन्नती योजनांबद्दल, सर्व बँकांनी योजनेअंतर्गत यावर्षी बचत गटांचे उद्दीष्ट साध्य करण्याविषयी सूचना दिल्या.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, जिल्हा प्रगतीपथावर येण्यासाठी बँक व शासकीय विभाग यांचा समन्वय गरजेचा असून सर्व बँकानी सामाजिक जबाबदारी समजून सर्व सामान्य व्यक्तिच्या विकासासाठी कार्यरत रहावे.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्र, विविध शासकीय विभागांचे व महामंडळाचे अधिकारी, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी तसेच सर्व बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. युवराज पाटील अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी विषयावार सादरीकरण केले.