मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त कोळकी गटात बैठक; फडणवीसांच्या कामातून उतराई होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा – रणजितसिंह नाईक निंबाळकर


स्थैर्य, फलटण, दि. 24 ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या फलटण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, कोळकी जिल्हा परिषद गट आणि दुधेबावी पंचायत समिती गणातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कोळकी येथे उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, मुख्यमंत्र्यांनी फलटण तालुक्यासाठी केलेल्या विकासकामांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी जनतेने २६ ऑक्टोबरच्या मेळाव्यास प्रचंड संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन केले. या बैठकीसाठी फलटण-कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून विकासाच्या बाबतीत मागे राहिलेल्या फलटण तालुक्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधी रुपयांची विकासकामे मंजूर करून मोठे उपकार केले आहेत, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले. ते म्हणाले, “या तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसण्याचे महत्त्वपूर्ण काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ५० वर्षे हा तालुका दुष्काळात होता. निरा देवघरचे हक्काचे पाणी तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी दुसरीकडे वळवून येथील जनतेवर अन्याय केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी निरा देवघर आणि धोम-बलकवडी प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि प्रत्यक्ष कामांना सुरुवात केली.”

तालुक्याच्या विकासातील महत्त्वाचे टप्पे अधोरेखित करताना नाईक निंबाळकर यांनी रेल्वे, रस्ते यांसारखे मूलभूत प्रश्न मार्गी लावल्याचे सांगितले. तसेच, तालुक्यात महसूल भवन, नवीन न्यायालय इमारत, पोलीस स्टेशन व पोलीस वसाहत, पालखी महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते आणि महापुरुषांच्या स्मारकांचे सुशोभीकरण यांसारखी अनेक छोटी-मोठी कामे मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळेच शक्य झाली आहेत, असे त्यांनी नमूद केले. याच कोट्यवधी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री येत असल्याने, कोळकी जिल्हा परिषद गटातील जनतेने त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यांच्या उपकाराचे ऋण फेडण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

आमदार सचिन पाटील यांनी आपल्या भाषणात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर असलेल्या प्रचंड विश्वासामुळेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे करणे शक्य झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, “राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही तालुक्यावर लक्ष असून, ते देखील निधी कमी पडू देत नाहीत.” या एकत्रित प्रयत्नांमुळे तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी कोळकी जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने, नेतृत्वाने जी अपेक्षा ठेवली आहे, ती पूर्ण करण्यासाठी सर्वजण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. गटातील जनता रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर यांनी दुधेबावी पंचायत समिती गणातून जास्तीत जास्त कार्यकर्ते आणि नागरिक मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, असे सांगितले.

या बैठकीस युवा नेते धनंजय साळुंखे-पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रणवरे, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीत नाईक निंबाळकर, भाजप मंडल अध्यक्ष बापुराव शिंदे, सुशांत निंबाळकर, सचिन सस्ते, बाळासाहेब काशिद, संतोष गावडे, युवराज सस्ते, यशवंत कारंडे, विकास सस्ते, सिध्दाराज कदम, रवि ढेबरे, विक्रम सावंत, विकास नाळे, भाडळीचे सरपंच पिसाळ, बाळासाहेब शिंदे, धनंजय मोरे, रवि धुमाळ, दिपक शिंदे, शिवाजीराव जाधव, विजय भिसे, महेंद्र गोळे, स्वागत कशिद, सचिन गुंजवटे, नाना आडके, सचिन चांगण, सतीश शेडगे, सोमनाथ ऐजगर, किरण लाळगे, बापुराव चव्हाण, धनंजय गावडे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!