अकोला येथे २५० खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आदेश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अकोला, दि.०८: अकोला येथील कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० खाटांचे कोविड रुग्णालय तातडीने सुरू करण्यात यावे असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांना दिले आहेत. याकामी अमरावतीचे विभागीय आयुक्त आणि अकोला जिल्हाधिकारी यांची मदत घेण्यात यावी असेही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी म्हटले आहे.

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात सध्या ४५० खाटांचे कोविड रुग्णालय उपलब्ध आहे यापैकी ६० खाटा अतिदक्षता विभागासाठी आहेत मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे रुग्णालय अपुरे पडत असल्याने तातडीने २५० खाटांचे  नवे कोविड  रुग्णालय सुरू करण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिले आहेत. यासाठी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मंत्री श्री. देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून विनंती केली होती. त्यानुसार निर्णय घेण्यात आल्याबद्दल ॲड. ठाकूर यांनी श्री. देशमुख यांचे आभार मानले आहेत.

अकोला येथे सूपर स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्याचे प्रस्तावित असून यासाठी आवश्यक असणाऱ्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक असणारे डॉक्टर आणि अन्य कर्मचारी यांची भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येत आहे, मात्र हे कर्मचारी उपलब्ध होईपर्यंत न थांबता याच इमारतीत कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या नियोजित कोविड  रुग्णालयातील २५० खाटापैकी ५० खाटा अतिदक्षता विभागासाठी असतील अशी माहिती देण्यात आली आहे. या कोविड  रुग्णालयासाठी आवश्यक असणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी तसेच नर्सेस स्थानिक रित्या नेमण्यात यावेत आणि तातडीने या रुग्णालयाचे काम सुरू करण्यात यावे असे आदेशही वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.


Back to top button
Don`t copy text!