मेढा नगरीचा सर्वांगिण विकास करणार- आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा , दि. २४: मेढा ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून देण्याबरोबरच या नगरीचे सर्वप्रकारचे प्रश्न ज्या- त्या वेळी सोडवले आहेत. सातारा- महाबळेश्वर रस्त्यावरील प्रमुख शहर असलेल्या मेढा नगरीचा कायापालट करण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार असून या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला. दरम्यान, सर्वांच्या विनंतीला मान देऊन नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष निवड बिनविरोध पार पाडल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व नगरसेवकांचे आभार मानले.
मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी पांडुरंग जवळ आणि उपनगराध्यक्षपदी कल्पना जवळ यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर दोघांचाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका कांचन साळुंखे,  मेढा नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रय पवार, नगरसेवक शशिकांत गुरव, शामराव जवळ, दत्तात्रय वारागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
नगराध्यक्षपदासाठी पांडुरंग जवळ आणि विकास देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमारे, ज्ञानदेव रांजणे यांनी देशपांडे यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. विनंतीला मान देऊन देशपांडे यांनी अर्ज माघारी घेतला आणि जवळ यांची निवड बिनविरोध झाली. निवड बिनविरोध पार पाडल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरसेवक देशपांडे यांच्यासह सर्वच नगरसेवकांचे आभार मानले. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शब्दाचा मान राखून एकजूट दाखवली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आतापर्यंत अनेक विकासकामे मार्गी लावली असून यापुढेही मेढा शहराच्या विकासासाठी वाट्टेल ते करू, असा शब्द आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी दिला.

Back to top button
Don`t copy text!