
दैनिक स्थैर्य । दि.२८ जानेवारी २०२२ । लोणंद । मुंबई येथे मंत्रालयात प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नगरपंचायत नगराध्यक्षपद आरक्षण सोडतीत सातारा जिल्ह्यातील लोणंद नगरपंचायतचे नगराध्यक्षपद अनुसुचित जातीसाठी राखीव तर खंडाळा नगरपंचायत नगराध्यक्षपद अनुसुचित जातीतील महिलेसाठी राखीव असल्याचे स्पष्ट झाले.
नगरपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार गेल्याच आठवडय़ात १९ तारखेस सर्व निकाल लागल्यानंतर आता नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय जाहीर होणार याकडेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे लक्ष लागून राहीले होते. मात्र, आजच्या आरक्षण सोडतीनुसार खंडाळा तालुक्यातील लोणंद व खंडाळा या दोन्ही नगरपंचायतीत अनुसुचित जातीतील नगराध्यक्ष होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. लोणंद नगरपंचायतीवर अनुसुचित जातीतील नगराध्यक्ष होणार आहे तर खंडाळा नगरपंचायतीवर अनुसुचित जातीतील महीला नगराध्यक्ष होणार असल्याचे आजच्या आरक्षण सोडतीवरून स्पष्ट झाले आहे. या आरक्षण सोडतीने अनेक दिग्गजांचा भ्रमनिरास झाला असून आता त्यांना पुढील टर्म पर्यंत वाट पाहण्याशिवाय गत्यंतर उरले नाही.
सध्या लोणंद नगरपंचायतीवर प्रभाग क्रमांक तीन मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या दिपाली निलेश शेळके आणि प्रभाग क्रमांक सात मधून राष्ट्रवादीकडून निवडून आलेल्या मधुमती पलंगे ( गालिंदे ) अशा दोनच उमेदवार मैदानात असणार आहेत. मात्र काँग्रेसकडे अवघे तीनच नगरसेवक असल्याने नगराध्यक्षपदावर बहुमतात असलेल्या राष्ट्रवादीच्या मधुमती पलंगे ( गालिंदे ) याच विराजमान होण्याची शक्यता आहे. तर खंडाळ्यात अनुसुचित जातीतून प्रभाग क्रमांक आठ मधून नंदा गायकवाड आणि प्रभाग क्रमांक सतरातून उज्वला संकपाळ या दोन्ही महिला राष्ट्रवादीकडून निवडून आल्या आहेत. यापैकी कोणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.