फलटण पालिकेवर महायुतीचीच सत्ता येणार, नगराध्यक्षपदाची निवडणूक ‘कमळ’ चिन्हावरच; रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची घोषणा


स्थैर्य, फलटण, दि. 14 नोव्हेंबर : “फलटण शहरात आपण वॉर्डात काय करतोय यापेक्षा शहराचे हित महत्त्वाचे आहे. त्यामुळेच या निवडणुकीत आपण २७-० असा निकाल लावून फलटण नगरपालिकेत महायुतीची एकहाती सत्ता आणण्याचा निर्णय घेतला आहे. नगराध्यक्षपदाची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ चिन्हावरच लढवली जाईल,” अशी महत्त्वपूर्ण घोषणा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

फलटण येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शिवरूपराजे खर्डेकर, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना रणजितसिंह यांनी आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट केली.

गेल्या काही दिवसांत झालेल्या पक्षप्रवेशांमुळे महायुतीची ताकद प्रचंड वाढली असल्याचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, “आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करत नाही, तर शहराच्या विकासाचे व्हिजन घेऊन पुढे जात आहोत. आतापर्यंत शहरात काय झाले यापेक्षा, पुढे आपण काय करणार आहोत, हे महत्त्वाचे आहे. त्यामुळेच २७ पैकी २७ जागा जिंकण्याचा आणि एकहाती सत्ता आणण्याचा आमचा निर्धार आहे.”

शब्दाला जागणारे कुटुंब सोबत

यावेळी रणजितसिंह यांनी माजी नगराध्यक्ष सोमशेठ जाधव (अण्णा) आणि त्यांच्या कुटुंबाचे भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, “माझ्या आयुष्यातील हा असा पहिलाच प्रवेश आहे जो केवळ शब्दावर आणि विश्वासावर झाला आहे. अण्णांचा शब्द मार्केटमध्ये हुंडीसारखा चालतो, त्यांचा शब्द कधीही बदलत नाही. माझ्या वडिलांच्या बरोबर काम करणाऱ्या नेत्यासोबत आता मला काम करण्याची संधी मिळत आहे, याचा मला विशेष आनंद आहे.”

सोमवार पेठेचा कायापालट करणार

सोमवार पेठेतील विकासाबाबत ग्वाही देताना रणजितसिंह म्हणाले की, सोमवार पेठेतील गटतट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील पिण्याचे पाणी, रस्ते आणि शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फलटण शहरात जी विकासकामे होतील, त्यापेक्षा काकणभर जास्त कामे सोमवार पेठेत करून दाखवू आणि या पेठेचा कायापालट करू, असा शब्द त्यांनी यावेळी दिला.

आगामी नगरपालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकताना त्यांनी चिन्हाबाबतचा संभ्रम दूर केला. महायुती म्हणून आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक भारतीय जनता पार्टीच्या ‘कमळ’ चिन्हावर लढवणार आहोत आणि त्याला आमदार सचिन पाटील यांच्यासह सर्वांनी संमती दिली आहे. आता निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या या घोषणेमुळे निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले असून, महायुती पूर्ण ताकदीने आणि एकाच चिन्हाखाली नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे अधोरेखित झाले आहे.


Back to top button
Don`t copy text!