स्थैर्य, मायाणी दि. 20 : 12 मे रोजी करोना ने खटाव तालुक्यात शिरकाव केल्यानंतर आठवडाभरातच करोना ने आपले पाय पसरायला सुरुवात केली. मायणी येथील अकोला येथून प्रवास करुन आलेले 55 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला यांचा अहवाल करोना बाधित आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली व मायणी व परिसरात एकच खळबळ उडाली.
एकाच दिवशी दोन पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडली असून तालुक्याचे संस्थात्मक विलगीकरण कक्ष असलेल्या मायणी येथे पती-पत्नी पॉझिटिव्ह आढळल्याने माय णीकर भयभीत झाले आहेत. तालुक्यातील करोना ग्रस्तांची संख्या तीन वर पोहोचली आहे. मायणीमध्ये व्यापारी दुकानदार विशेषता भाजी मंडइमध्ये वारंवार सोशल डिस्टन्सिंचा फज्जा उडत होता. व्यापारी व ग्राहक ही बेफिकीर वागत होते. होम कोरंटाईन केलेले काहीजण गावातून फिरत होते.ही स्थिती करोना ला निमंत्रित करणारीच होती.
खरशिंगे येथे करोना ग्रस्त सापडल्यानंतर सात-आठ दिवस तालुक्यात रुग्ण न सापडल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला होता. मात्र काल मुंबई-अकोला मार्गे खाजगी गाडीतून आठ दिवसांपूर्वी मायणीत आलेल्या तिघांपैकी दोघांना करोना झाल्याचे काल रात्री उशिरा समजले. करोना बाधित दोघे एकाच कुटुंबातील असून ते पती-पत्नी आहेत. त्यांच्यासोबत प्रवास करणार्या त्यांच्या मुलाचा रिपोर्ट येणे बाकी आहे. हे तिघेही मायणीचे रहिवासी आहेत. आरोग्य विभागाने त्यांना होम कोरंटाइन केले होते. एकाच वेळी दोघेजण पॉझिटिव्ह आढळल्याने मायणीकर चांगलेच धास्तावले असून गावात सर्वत्र स्मशान शांतता पसरली आहे.
गेल्या दोन महिन्यापासून चालू असलेले लॉकडाऊन यामध्ये भागाभागातील परस्थिती पाहता शासनाने दिलेली ढील यामुळे गावात व बाजारात निर्धास्त होऊन फिरणारे नागरिक यांना मायणीत अकोल्याहून आलेल्या दांपत्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने चांगलाच धक्का बसला आहे. अखेर मायणीत कोरोनाची एन्ट्री झाली असून सध्या मायणी पूर्णपणे सील करण्यात येऊन पूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या करोना बंधितांच्या संपर्कातील साखळी आणखी किती वाढतेय का काय? या भीतीने मायणीसह परिसरातील रहिवाश्यांची गाळण उडाली आहे. आधी चीन, पुन्हा देशाची मोठी शहरे, नंतर जिल्ह्याची मध्यवर्ती ठिकाणे व आता ग्रामीण भागाकडे करोनाने वळवलेला मोर्चा यातून लोकांनी धडा घेत पोलीस व प्रशासनाने घालून दिलेले अटींचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे.