दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२२ । लोणंद । टाळ-मृदुंगाचा निनाद करत माऊली जयघोषात लोणंद करांनी रात्र जागून काढली. खेळणी, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी लहान मुले व महिलांनी गर्दी केली होती. छोटे-मोठे साहित्य खरेदी करण्यासह माऊच्या दर्शनाचा आनंद लुटला. पावसाने दडी मारल्यामुळे भाविकांनी माऊलीला पाऊस पडून दे, अशी साद घातली. पालखी सोहळ्यामध्ये माऊलीचा जयघोष करत लोणंद करांनी रात्र जागून काढली. त्यामध्ये ढगांनी आच्छादलेले आकाश, आल्हाददायक वातावरण, एखाद्या लहानशा ऊन -सावलीचा खेळ याचबरोबर दिंडी – दिंडीतून येणारे अभंग, भुपाळ्या, गवळणी, वासुदेव, आंधळे – पांगळे, गुरुपरंपरेचे अभंग, आदींचे मंगलमय सूर संपूर्ण वातावरणात हा सोहळा अधिकच नयनरम्य झाला. लोणंदमध्ये पालखी सोहळा अडीच दिवसाच्या मुक्कामासाठी आला आहे. त्यामध्ये माऊलीच्या दर्शनासाठी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पालखीतळ नवी पेठ खंडाळा रस्ता निरा सातारा रस्ता अशी दोन्ही बाजूला किमान एक एक किलोमीटर महिला व पुरुषांनी दर्शनासाठी रांगा केल्या होत्या. महाराष्ट्र शासनाच्या विविध चित्ररथांद्वारे पर्यावरण, वाहतुकीचे नियम, स्वच्छता आदींबाबत जनजागृती करण्याचे काम अनेक ठिकाणी सुरू होते. नगरपंचायत मदत केंद्र, आरोग्य, महसुल, पचांयत समिती, वितरण विभाग विभागाचे कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी यांच्यासह रुग्णवाहिका, औषध साठा आणि पालखीतळावर २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होती. तसेच लोणंद मेडिकल, लोणंद रोटरी क्लब इनरव्हील क्लब यांच्यातर्फे वारकऱ्यांना व भक्तगणांनाऔषध वाटप, तपासणी, शिबिरे, व्यसनमुक्ती समूह दर्शन आदी उपक्रम राबवले आहेत. तसेच लोणंद व्यापारीअसोसिएशन, सराफ असोसिएशन यांच्या सहअनेक सेवाभावी संस्थांनी चहा नाष्टा जेवणावळी देण्यात आले.
हा पालखी सोहळा गुरुवारी ( दि. ३०) रोजी दुपारी एक वाजता लोणंदवरून तरडगाव कडे प्रस्थान करेल. नंतर सुमारे चार वाजण्याच्या सुमारास पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होईल. त्यानंतर तरडगाव मुक्कामासाठी जाणार आहे. लोणंद येथे सातारा, कराड, कोल्हापूर, भोर, महाड, कोकण या ठिकाणाहून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी येत असतात. काल संध्याकाळपासूनच दर्शनासाठी स्री-पुरुषांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. रात्रभर ठिकठिकाणी चाललेल्या भजन किर्तनात लोणंदकर दंग होऊन गेलेत. अवघे लोणंद भक्तिमय वातावरणात लिन झालेले आहे.