
स्थैर्य, फलटण, दि. २६ सप्टेंबर : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून, लोप पावत चाललेल्या जुन्या संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने ‘माऊली फाउंडेशन’च्या वतीने येत्या बुधवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सामूहिक कुमारिका पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात फलटण शहरातील जुने गावठाण भागातील कुमारिकांचे पूजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती माऊली फाउंडेशनचे संस्थापक अनुप शहा यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
भारतीय संस्कृतीतील कुमारिका पूजनाची परंपरा जपून ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले. या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात नागरिकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.